Karnataka Assembly Elections : कर्नाटकात आज मतसंग्राम

224 जागांसाठी भाजप, काँग्रेस, जेडीएसमध्ये कडवी झुंज
Karnataka Assembly Elections : कर्नाटकात आज मतसंग्राम

बंगळूरु । वृत्तसंस्था Bangalore

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असून सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती द्यायच्या हे मतदार ठरवणार आहेत. बुधवारी 10 मे रोजी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी कर्नाटकातील 5 कोटी 31 लाख मतदार मतदान करणार असून हे मतदान राज्यातील 2,615 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.येथे सत्तारूढ भाजपविरोधात काँग्रेस अशी येथे झुंज आहे. काही ठिकाणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचीही ताकद आहे.

गेले पंधरा दिवस देशभरातील प्रमुख नेते कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप मोठ़या प्रमाणात करण्यात आले. भाजपची सारी भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर आहे. दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य पुन्हा जिंकून भाजप 38 वर्षांचा इतिहास मोडणार का? ही उत्सुकता आहे. तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे आहे. येथे सत्ता आल्यास काँग्रेसचे महत्त्व वाढणार आहे.

माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने सत्तेसाठी सारी ताकद लावली आहे. स्थिर सरकारची घोषणा सर्वच पक्षांनी दिली आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र तसेच राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकास होईल यावर भर दिला. पंतप्रधानांनी 19 मोठ़या सभा तसेच सहा रोड शो केले. निवडणूक जाहीर झाल्यापासून म्हणजेच 29 मार्चपासून सात वेळा पंतप्रधानांनी राज्याचा दौरा केला. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी 206 सभा तसेच 90 रोड शो केले. काँग्रेसचा प्रचार प्रामुख्याने राज्यातील नेत्यांनी केला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक सभा घेतल्या. राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांनीही मोठ़या प्रमाणात प्रचारात सहभाग घेतला.

58,282 मतदार केंद्रे

निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांनुसार कर्नाटकात 5.2 कोटी पात्र मतदार आहेत. तर 9.17 लाख नवमतदार आहेत. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी राज्यात 58 हजार 282 मतदार केंद्रे उभारण्यात आली आहेत.

.

224 जागांसांठी 2,615 उमेदवार

224 जागांसाठी 2,615 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात महिलांची संख्या फक्त 185 एवढी आहे. भाजपाने सर्व 224 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत, काँग्रेसने 223 तर जेडीएसने 207 जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

पंतप्रधान मोदींचे कानडींना खुले पत्र

मतदानाच्या एक दिवसआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मतदारांना आवाहन करणारे एक खुले पत्र लिहिले आहे. तसेच एका व्हिडीओ संदेशाद्वारे भाजपाला पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले आहे. आपल्या आवाहनादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला. माझ्यासाठी हे दैवी आशीर्वादापेक्षा कमी नाही. स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या वर्षात आपला देश एक विकसित राष्ट्र बनावे, असे ध्येय सर्व भारतीय नागरिकांनी ठरवले आहे. हे ध्येय गाठण्यासाठी कर्नाटक राज्य पुढाकार घेत असून या ध्येयाप्रति वाटचाल करीत आहे.

आज भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमाकांची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्याला लवकरात लवकर सर्वोच्च तीन अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये सामील व्हायचे आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा कर्नाटकची अर्थव्यवस्था जलदगतीने पुढे जाऊन एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पूर्ण करेल. शहरी आणि ग्रामीण भागातील सोयी-सुविधा उभारण्याबाबत मोदी म्हणाले की, भावी पिढ्यांसाठी कर्नाटकमध्ये शहरी सोयी-सुविधा उभारण्याचे काम भाजपा सरकार यापुढेही करीत राहील. वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, ग्रामीण आणि शहरी भागातील जीवनशैली सुधारणे आणि महिला व युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याचे काम आम्ही करीत राहू. कर्नाटकमधील प्रत्येक माणसाचे स्वप्न हे माझे स्वप्न आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्वच पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

भारतीय निवडणुकांचा अभ्यास आणि निरीक्षण करणार्‍या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ केले आहे. त्यापैकी काँग्रेसमध्ये 31 टक्के, भाजपा 30 टक्के आणि जेडीएसमधील 25 टक्के उमेदवारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत.

कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ची संधीच मिळणार नाही : पटोले

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे काँग्रेसला मोठे समर्थन असल्याचे चित्र असून जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. त्यामुळे तेथे ऑपरेशन लोटस करण्याची वेळच भाजपवर येणार नाही. जनताच भाजपचे ऑपरेशन करणार आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी सातारा येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला. कर्नाटकात भाजपची अवस्था नॅनो कारमध्ये बसावे लागेल अशी होईल, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

नाना पटोले हे सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी कर्नाटक निवडणुकीवरून भाजपवर जोरदार टीका केली. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे पटोले म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com