
पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati
कौंटुबिक वादातून जावई व मुलाने मानलेल्या मुलीवर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या हल्ल्यात महिलेस गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी (दि.२७) सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान, दिंडोरी रोडवर हा प्रकार घडला. या हल्ल्यात आरती वानखेडे यांना गंभीर दुखापत झाली आहे...
अरुणा एकनाथ लोखंडे (रा. अश्वमेध नगर) यांनी पंचवटी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई मनोहर सोमनाथ मोंढे याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत. या वादास आरती वानखेडे कारणीभूत असल्याचा आरोप करीत जावई मनोहर मोंढे व मुलगा मनिष एकनाथ लोखंडे याने आरतीवर हल्ला केला.
यात मनोहरने विळ्याने वार केल्याने आरती यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमीची चौकशी केली, तर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.