
गुवाहाटी :
मुख्यमंत्र्यांसाठी वाहतूक(Traffic) थांबवणे अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांस धारेवर धरत, वाहतूक का थांबवली? कोणी राजा महाराजा येत आहे का? या पुढे असे करु नको, असे संतापात मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात (social Media) व्हायरल झाला आहे. ही घटना विदेशातील नाही तर भारतातीलच आहे.
आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himata Biswa Sarma) यांचा हा व्हिडीओ आहे. त्यांच्या ताफ्याला मार्ग मोकळा करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वाहने थांबवून ठेवली होती. त्यामुळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हे पाहिल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा संतापल्याचे व्हिडीओत दिसते. शेवटी जनतेला हात जोडून पुढे गाडी नेण्याची विनंती ते करतांना दिसत आहे.
मुख्यमंत्री काही अधिकारी व नेत्यांसह रस्त्याने चालत जात असल्याचे व्हिडीओ दिसते. त्यावेळी त्यांना वाहतूक कोंडी झाल्याचे निदर्शनास येते. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनांच झापलं. 'डीसी साहेब हे काय नाटक आहे? गाड्या का थांबवल्या आहेत. कोणी राजा, महाराजा येत आहेत का? असं करू नका. लोकांना त्रास होत आहे. वाहनाना जाऊ द्या,’.
ही घटना आसाममधील नागांव जिल्ह्यातील गुमोथा गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग 37 वर घडली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवली होती. पण जेव्हा मुख्यमंत्री तिथे पोहचले तेव्हा त्यांना मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसते. हे पाहून त्यांनी आपली गाडी थांबवत खाली उतरले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले.