Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखासदारकीच्या लढतीसाठी दिग्गजांची मोर्चेबांधणी

खासदारकीच्या लढतीसाठी दिग्गजांची मोर्चेबांधणी

नाशिक । रवींद्र केडीया Nashik

राजकीय पटलावर अप्रत्यक्षपणे निवडणुकांचे रणसिंग फुंकले जात असतानाच नाशिकमधील राजकारण्यांनीही गती घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकमधून अनेक जण इच्छूक असून ते खर्‍या तयारीला लागल्याचे चित्र आहे. त्यात अनेक दिग्गजांच्या नावांची चर्चा होत आहे.

- Advertisement -

नाशिक लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांची संख्या दिवसागणित वाढत आहे. माजी खासदार समीर भुजबळ, खासदार हेमंत गोडसे यांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केल्याची चर्चा आहे. त्याचवेळी भाजपकडूनदेखील इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही जागा भाजप व शिंदे गट शिवसेना यांच्यापैकी कोणाला सुटणार? हादेखील कळीचा मुद्दा ठरत आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी खासदार देविदास पिंगळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अ‍ॅड.नितीन ठाकरे, माजी खासदार समीर भुजबळ अथवा शेफाली भुजबळ यांच्या नावांची चर्चा होत आहे. त्यात आता राष्ट्रवादीकडून खुद्द छगन भुजबळच मैदानात उतरण्याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनीही नाशकातून निवडणूक लढण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. मतदारसंघात उघडलेल्या शंभर शाखांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते उभे करून बारा बलुतेदारांच्या जोरावर निवडणूक लढण्याचा आणि जिंकण्याचा मनसुबा त्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची कारकीर्द विकासकामांमुळे देदीप्यमान आहे. प्रत्येक कामातील् ‘एकला चलो रे’ भूमिकेतून ते झेप घेताना दिसून आले आहेत. त्यामुळे निवडणुकीत मतदार त्यांना पसंती देतील, असा विश्वास व्यक्त केला जात असला तरी निवडणुकीत जागा सुटण्यावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपने पदाधिकार्‍यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा स्वबळाचा नारा दिल्याने शिंदे गटाची चिंता वाढली आहे.

सद्यस्थितीत शिंंदे गटाकडे असलेल्या खासदारांच्या जागा सोडण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. याबाबत दोन्ही पक्षांकडून कोणतीही स्पष्ट विधान येत नसली तरी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत लोकसभेच्या सर्व जागा लढण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आल्याने भाजपतून निवडणूक तयारीला गती मिळाली आहे.

भाजपच्या वरिष्ठांकडून इच्छुकांना चाल देण्याचे काम केले जात आहे. नूतन शाळेच्या उद्घाटनाला शिवाजीनगर येथे आलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सभागृह नेते दिनकर पाटील यांचे काम मोठे असून त्यांना साथ देण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी करीत असलेल्या दिनकर पाटील यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. महानुभाव पंथ, विविध समाज बांधवांच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध समाज बांधवांची मोट बांधण्याचे काम त्यांंनी केले आहे. प्रभागात विविध समाजमंदिरांची उभारणी करताना जिल्हा नेतृत्वाला निमंत्रित करून स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसून येत आहे.

मध्यंतरी ज्येष्ठ आमदारांनी खासदारकीची निवडणूक लढवावी, असा विचार भाजप पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी खासदारकी लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यामुळे त्यांचाही या जागेसाठीचा दावा पुढे येऊ लागला आहे. यासोबतच आमदार राहुल ढिकले व आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याही नावाची चर्चा होत आहे. शिवसेनेचे विजय करंजकर यांचा जनसंग्रह मोठा आहे. नातेगोत्यांच्या माध्यमातून लोकसभा मतदार संघात मोठा गोतावळा आहे. मराठा कार्ड, शिवसेनेची जिल्हातील ताकद, महाआघाडीच्या बळ यावर ते नाशिक लोकसभेच्या जागेवर हक्क सांगत आहेत.

या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांनी आपली ताकद पणाला लावण्यास प्रारंभ केला आहे. राजकीय घडामोडींच्या अशा वातावरणात राजकीय वर्चस्व, जातीय समिकरणे, सामाजिक कार्य, पक्षांतर्गत राजकारण, तिकिटांची रस्सीखेच या सर्व खेळांत कोण पुढे निघतो ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या