Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआरक्षणाचा धक्का; निवडणुकीपूर्वीच इच्छुकांची दांडी गुल

आरक्षणाचा धक्का; निवडणुकीपूर्वीच इच्छुकांची दांडी गुल

नाशिक । विजय गिते Nashik

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद गटांच्या( Zilla Parishad ) रचनेत कुठलाही बदल झालेला नसला तरी आरक्षणामुळे मात्र सर्वपक्षिय इच्छुकांची प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरण्याआधीच विकेट पडल्यामुळे घोर निराशा झाली आहे. नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे चारही गट अनुसूचित जमाती (महिला) या प्रवर्गासाठी तर चांदवड तालुक्यातील पाच गटांपैकी एकच गट सर्वसाधारण महिलेसाठी तर उर्वरित चारही गट हे अनुसूचित जमाती महिलेसाठी तीन तर एक अनुसूचित जाती महिला राखीव झाला आहे.यामुळे सर्वसाधारण व इतर मागास प्रवर्ग या गटातील इच्छुकांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ धरुन बसण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणामुळे जिल्हयाच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र असलेल्या निफाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, तालुक्यातील अनेक मातब्बरांना आरक्षणाचा फटका बसला आहे. तालुक्यातील दहा गटांपैकी तब्बल आठ गट हे राखीव झाले आहे. पिंपळगाव बसवंत गट ओबीसी महिला तर, लासलगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे.यामुळे बदलेल्या आरक्षणाचा तालुक्यातील मातब्बरांना फटका बसला असून, राखीव उमेदवारीसाठी सर्वच पक्षांना कसरत करावी लागणार आहे.

उंगाव गट अनुसूचीत जमातीसाठी राखीव झाल्याने माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, काँग्रेसचे नेते भास्कर पानगव्हाणे, राजाराम पागगव्हाणे यांचे पुत्र गौरव पानगव्हाणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुभाष कराड यांचा हिरमोड झाला आहे. विंचूर गट अनुसूचीत जातीसाठी राखीव झाल्याने, माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सभापती किरण थोरे यांसह निवडणुकीच्या आखाडयात उतरण्याच्या तयारीत असलेले आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांची अडचण झाली आहे. सायखेडा गटातून दावेदार असलेले डॉ.प्रल्हाद डेर्ले, सुरेश कमानकर, गोकुळ गिते, माजी उपाध्यक्ष दिंगंबर गिते यांचे पुत्र नरेश गिते, खंडू बोडके यांनाही ब्रेक लागला आहे.

सायखेडा गट राखीव झाला आहे. आता या गटातून माजी जि.प. सदस्य दीपक शिरसाठ आपले नशीब अजमावू शकतात. चांदोरी गट राखीव झाल्याने राष्ट्रवादीचे सिध्दार्थ वनारसे यांसह इच्छूक उत्तम गडाख, संदीप टर्ले यांना आता थांबावे लागेल. कसबे सुकणे गटातून माजी आमदार अनिल कदम यांच्या पत्नी वैशाली कदम व भाजपचे यतिन कदम यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, हा गट राखीव झाला आहे. देवगांव गट राखीव झाल्याने अमृता पवार यांनाही गट राहिलेला नाही. पिंपळगाव बसवंत गटात गणेश बनकर, सतीश मोरे, भास्कर बनकर यांच्यात तिरंगी लढत होणार अशी चर्चा तालुकाभर होती.

मात्र,हा गट ओबीसी महिलेसाठी आरक्षीत झाल्याने आता या गटातून माजी सदस्या तथा आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर निवडणूक रिंगणात उतरू शकतात. त्यांच्या विरोधात भास्कर बनकर यांच्या पत्नी तथा पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली बनकर यांच्यात सामना होऊ शकतो. पिंपळस गटात विलास मत्सागर, शरद नाठे आदी तर पालखेड गट एसटी महिलेसाठी राखीव झाल्याने या गटातून सुलभा नंदू पवार निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे. अनुसूचीत जमाती व जाती करिता आठ गट राखीव झाल्याने तालुक्याबाहेरून उमेदवार आयात करण्याची वेळ पक्षांवर येऊ शकते.

दीपक शिरसाठ यांना दोन ते तीन ठिकाणी संधी

अनेक माजी सदस्यांना गट राखीव झाल्याने अडचण झालेले असताना दीपक शिरसाठ यांना मात्र, तालुक्यातील तीन ते चार गटाचे दरवाजे खुले झाले आहे. चांदोरी, सायखेडा, उगांव या गटातून शिरसाठ यांच्या उमेदवारीसाठी आग्रह सुरू झाला आहे. तर, पिंपळस गट अनुसूचीत जमाती स्त्रीसाठी राखीव झाला असून त्यांच्या कुटुंबातून उमेदवारीसाठी आतापासून कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला आहे.

अश्विनी आहेर यांचा पत्ता कट

नांदगाव तालुक्यात साकोरा, न्यायडोंगरी, भालूर व जातेगाव असे चार गट आहेत. यातील न्यायडोंगरी गटाच्या माजी सदस्या अश्विनी आहेर या महिला व बालकल्याण सभापती राहिल्या. त्यांच्या विरोधात विलास आहेर हे उमेदवारीची तयारी करत होते. आरक्षणामुळे या दोघांचाही पत्ता कट झाला आहे. तर भालूर गटातून लढण्याची प्रबळ इच्छा बाळगून असलेले माजी आमदार संजय पवार यांचीही घोर निराशा झाली.तसेच 2017 मध्ये निर्माण झालेल्या जातेगाव गटात गेल्या वेळी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे यंदा ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटेल, अशी अपेक्षा बाळगून असलेले बाजार समितीचे सभापती तेज कवडे यांचीही निराशा झाली.

नांदगाव तालुक्यातील सर्व गट आरक्षित झाल्याचे लक्षात येताच पंचायत समितीचे माजी सभापती कुटे यांनी सोडतीवर हरकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तोंडी हरकती फेटाळून लावत पुराव्यांसह लेखी हरकत घेण्याचे आवाहन केले. सर्व गटांमध्ये एकच आरक्षण निघाल्याचे समजताच सर्वपक्षिय इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून काढता पाय घेतला. याठिकाणी आता आरक्षणानुसार उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

बनकर, पवार, दराडे यांची कोंडी

माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट आहेत. यातील जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांचा पाटोदा हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. तर त्यांना अपेक्षा लागून असलेला मुखेड हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाल्यामुळे त्यांची राजकीय कोंडी झाल्याचे दिसून येते. अशीच कोंडी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांची झाली आहे.

संभाजी पवार यांची वहिणी सविता पवार या नगरसूल गटातून निवडून आल्या होत्या. आता हा गटही अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. नगरसूल या गटात पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण गायकवाड हे इच्छुक आहेत. त्यामुळे एकतर उमेदवारी करण्याची संधी नाही. घरातील महिलेस उमेदवारी द्यायची म्हटले तर पाटोदा या एकमेव गटाचा पर्याय पवार व बनकर या दोघांसमोर आहे.

शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे यांना राजापूर गटातून पुन्हा उमेदवारीची संधी मिळणार असल्याचे दिसते. याठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे हे इच्छुक होते. पण हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांचाही हिरमोड झाला आहे.अंदरसूल गटात सर्वसाधारण महिला हेच आरक्षण निघाल्याने येथेही महिलेला उमेदवारीची संधी मिळणार आहे. तालुक्याचा एकंदरित विचार केला तर माजी सभापती संजय बनकर, संभाजी पवार व कुणाल दराडे या तिघांचीही राजकीय कोंडी झाली आहे.

डांगसौदाणे, ताहराबाद, नामपूरकडे दिग्गजांचे लक्ष

बागलाण तालुक्यातील एकूण आठ गटांपैकी मुल्हेर, डांगसौंदाणे सर्वसाधारण (महिला)व ताहाराबाद हे गट सर्वसाधारण झाले आहेत. ठेंगोडा व ब्राह्मणगाव अनुसूचित जमाती तर जायखेडा व विरगाव गट अनुसूचित जमाती (महिला) राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढविणार्‍यांचा हिरमोड झाला आहे.

नामपुर हा गट ओबीसीसाठी राखीव झाला आहे. या गटातून माजी सभापती यतिन पगार, जिभाऊ कापडणीस, दीपक पगार, विनोद सावंत, सचिन सावंत यांच्या कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरू शकतात. ताहाराबाद गटातून माजी सदस्य डॉ.प्रशांत सोनवणे यांसह गणेश पवार, नितीन भामरे, किशोर खैरणार हे नशीब आजमावू शकतात.

माजी महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील या मुल्हेर अथवा डांगसौंदाणे गटातून नशीब आजमावू शकतात. मात्र,त्यांचे पती यशवंत पाटील यांना ठेंगोडा गट हा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने त्यांना ही निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही.पप्पू बच्छाव,विलास बच्छाव यांनाही आता थांबावे लागणार आहे. डांगसौदाने गटातून सिंधुताई संजय सोनवणे यासह माजी सदस्य प्रा. अनिल पाटील यांच्या पत्नी सारिका अनिल पाटील नशीब आजमावू शकतात.

देवळ्यात आहेर कुटूंबियांची अडचण

देवळा तालुक्यातील तिन्ही गट हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असल्याने तालुक्यावर वर्चस्व असलेले आहेर कुटुंबियांची मोठी अडचण झाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, माजी सदस्य प्रशांत देवरे, धनश्री आहेर, नूतन आहेर यांना आता गट राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.माजी सभापती उषा बच्छाव यांच्यासमोर तिन्ही गटांचा पर्याय आहे.

सुरगाणा, पेठमध्ये आयात उमेदवारांना संधी

सुरगाणा तालुक्यातील चारही गट हे सर्वसाधारण प्रवगार्साठी खुले झाले आहेत.यामध्ये गोंदुणे,भदर व भवाडा हे गट सर्वसाधारण तर बोरगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे.यामुळे या चारही गटातून अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनाही या गटात निवडणूक लढवता येईल. यामध्ये माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे पुत्र समीर चव्हाण हे भदर गटातून तर माजी आमदार जे.पी.गावित यांचे चिरंजीव इंद्रजीत गावित हे भवाडा गटातून आपले नशीब आजमावू शकतात. तसेच भाजपाचे पदाधिकारी एन.डी गावित हेही गोंदुणे गटातून निवडणूक लढवू शकतील, अशी शक्यता आहे.

याशिवाय तालुक्यातील गट खुले झाल्याने बाहेरून उमेदवार येऊ शकतात. पेठ तालुक्यात दोनचे तीन गट निर्माण झाले आहे. यामध्ये सुरगाणा,कोहोर आणि कुंभाळे हे तीनही गट सर्वसाधारण प्रवगार्साठी खुले झाले असून यातील कोहोर गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. पेठ तालुक्यावर माजी सदस्य भास्करराव गावित यांचे वर्चस्व असून ते अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सर्वसाधारण गटातून उमेदवारी करू शकतात. याशिवाय माजी जि.प. सदस्य मनोज घोंगे, नामदेव हलकंदर आदी रिंगणात उतरू शकतात.

कळवणमध्ये दिग्गजांची अडचण

देशाच्या केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या जिल्हयातील पहिल्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार व आमदार नितीन पवार यांच्या कळवण तालुक्यातील पाचही गट खुले झाले आहेत. तालुक्यातील सर्व गट खुले झाले असल्याने, माजी अध्यक्षा जयश्री पवार, नितीन पवार यांचे पुत्र ऋषीकेश पवार, माजी सदस्य यंशवंत गवळी यांची अडचण होणार आहे.

यात पुनदनगर मधून जयश्री पवार, मनिषा भामरे, मिनाक्षी हिरे निवडणूक लढवू शकतात. याशिवाय माजी सदस्या गीताजंली गोळे-पवार यांनाही तालुकाबाहेर अन्य गट शोधावा लागणार आहे. मानूर गटातून रवींद्र बाबा देवरे, भूषण पगार, धनजंय पवार, अ‍ॅड. भाऊसाहेब पवार, शीतलकुमार अहिरे, शैलेश पवार, रवींद्र बोरसे हे निवडणूक लढवू शकतात.

कनाशी गटात संगिता देवरे, वैशाली शिरसाठ, आश्विनी पाटील, सोनाली जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. सर्वसाधारण झालेल्या अभोणा गटात यशवंत गवळी पाचव्यांदा नशीब अजमावू शकतात. दळवट गटात ऋषीकेश पवार प्रबळ दावेर होऊ शकतात.

दिंडोरीत राजकारण ढवळणार

निफाड पाठोपाठ सत्तेचे केंद्र असलेले दिंडोरी तालुक्यातील सर्व गट खुले झाल्याने, तालुक्याचे राजकारण आता खर्‍या अर्थाने ढवळून निघणार आहे.तालुक्यातील सातही गट हे सर्वसाधारण झाले असून यापैकी अहिवंतवाडी,खेडगाव,वरखेडा, उमराळे बुद्रुक व मोहाडी हे सर्व साधारण झाले असून उर्वरित कसबे वणी व कोचरगाव हे गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहेत. कोचरगाव गटातून माजी सभापती सुनिता चारोस्कर प्रबळ दावेदार होऊ शकतात.

अहिंवंतवाडी गटातून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ रिंगणात उतरणार हे निश्चित मानले जात आहे. येथून माजी आमदार धनराज महाले यांचे पुत्र वैभव महाले देखील नशीब अजमावू शकतात. त्याशिवाय संतोष नेहेरे देखील इच्छुक आहेत. उमराळे बु. गटात माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे रिंगणात उतरू शकतात. याशिवाय शाम हिरे, अशोक टोंगारे यांच्या नावांची चर्चा आहे.

वरखेडा गटात राजाभाऊ ढगे यांचे नाव आघाडी वर आहे. राजेंद्र उफाडे देखील निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहे. खेडगाव गटातून दत्तात्रय पाटील, माजी अध्यक्षा विद्याताई पाटील, सुरेश डोखळे, माजी सभापती शोभाताई डोखळे नशीब अजमावू शकतात.

कसबे वणी गटातून विलास कड, गंगाधर निखाडे यांच्या घरातील महिला रिंगणात असू शकतात. मोहाडी गटातून माजी सदस्य प्रवीण जाधव पुन्हा रिगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यांचा सामना तुकाराम जोंधळे यांच्याशी होऊ शकतो.

चांदवडमध्ये महिलाराज

चांदवड तालुक्यातील पाच गटांपैकी सर्वच्यासर्व पाचही गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. धोडंबे,दुगाव, वडाळीभोई हे गट अनुसूचित जमाती(महिला)साठी राखीव झाले आहे तर तळेगाव रोही हा गट अनुसूचित जाती(महिला)साठी राखीव झाला आहे.

वडनेर भैरव हा एकमेव सर्वसाधारण गट खुला झाला असून तोही महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड,माजी सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे यांचे पुन्हा जिल्हा परिषदेत येण्याचे स्वप्न भंगले आहे.

याशिवाय माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे पुत्र राहूल कोतवाल देखील निवडणुकीच्या तयारीत होते. परंतू, त्यांना गट राहिला नाही. वडनेर भैरव हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यामुळे या गटातून आता माजी आमदार उत्तमबाबा भालेराव यांच्या परिवातील महिला, युवा नेते प्रमोद माळी, माजी सभापती ज्योती माळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास भवर, माजी सदस्य संपत वक्ते, शांताराम भवर, अनिल कोठुळे, संजय पाचोरकर हे आपल्या कुंटुंबातील महिलेस निवडणूक रिंगणात उतरवू शकतात.

तुंगार, ढिकलेंची निराशा

नाशिक तालुक्यातील पाच गट असून यातील दोन गट राखीव झाले आहे. तर, दोन गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. गोवर्धन गट खुला झाला आहे. माजी खासदार देवीदास पिंगळे व विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा तालुका असलेल्या या गटात आरक्षणाने राजकीय समीकरणे बदलणार आहे. गोवर्धन गट खुला झाला असल्याने या गटातून माजी अध्यक्षा विजयश्री चुंभळे, माजी सभापती रत्नाकर चुंभळे, शिवाजी चुंभळे यांचे पुत्र अंजिंक्य चुंभळे यांच्यात लढत होऊ शकते.

सर्वसाधारण महिला झालेल्या लहवित गटातून खासदार गोडसे यांच्या स्नुषा भक्ती गोडसे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या कुटुंबातूनही उमेदवारी होऊ शकते. पळसे गट राखीव झाल्याने संजय तुंगार, निवृत्ती जाधव यांची मोठी निराशा झाली आहे. पिप्री सय्यद गट राखीव झाल्याने यशवंत ढिकले, अनिल ढिकले यांना थांबावे लागणार आहे. या गटातून आमदार हिरामण खोसकर यांच्या स्नुषा माजी सभापती अर्पणा खोसकर यांची उमेदवारी होऊ शकते. गिरणारे गटातून दिलीप थेटे व विष्णुपंत म्हैसधुणे उमेदवारी अंतिम मानली जात होती. परंतू, हा गट महिला राखीव झाल्याने या गटातून अलका दिलीप थेटे यांची उमेदवारी अंतिम मानली जात आहे.

मालेगावात दिग्गजांना दोनच गटात संधी

माजी कृषीमंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ असलेल्या मालेगाव तालुक्यातील 9 गटांपैकी दोनच गटांमध्ये सर्वसाधारण उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यातही एक जागा महिलांसाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांची कोंडी होईल. विद्यमान सदस्य जे. डी. हिरे यांचा निमगाव हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव निघाल्याने त्यांना संधी नसेल.

तर नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांना पराभूत करुन मिनी मंत्रालयात आलेले लकी गिल यांचाही कळवाडी गट राखीव झाला आहे. या सदस्यांसह इच्छुकांचाही हिरमोड झाला आहे.झोडगे, कळवाडी, रावळगाव, निमगाव,दाभाडी हे चार गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तर अस्ताणे व वडेल या दोन ठिकाणी सर्वसाधारण महिला उमेदवारी करु शकतील. टाकळी गटात अनुसूचित जमातीच्या महिलेस उमेदवारी करण्याची संधी मिळणार आहे.

कोकाटे, खुळे यांना पुन्हा संधी

सिन्नर तालुक्यातील सात गटांपैकी शिवडे, नांदूर शिंगोटे हे दोन गट अनुसूचित जमाती व माळेगाव अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित झाला असून उर्वरित तीन गट सर्वसाधारण झाले आहेत. सर्वसाधारण असलेल्या चार गटांपैकी मुसळगाव व सोमठाणे महिला राखीव झाले आहेत. दापूर व पांगरी हे दोन गट सर्वसाधारण आहे.

या आरक्षण सोडतीमुळे शीतल सांगळे, सिमंतिनी कोकाटे व वैशाली खुळे यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. मात्र, यावेळी दापूर गटातून शिवसेनेचे युवानेते उदय सांगळे निवडणूक लढवणार आहे. माळेगाव गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कोंडाजीमामा आव्हाड व शिवसेनेचे संजय सानप यांची तयारी पाण्यात गेली आहे. दापूर गटातून शिवसेनेचे उदय सांगळे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांच्यात लढतीची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, कोंडाजीमामा यांचे मुळगाव वडगाव सिन्नर दापूर गटात येत असल्यामुळे कदाचित राष्ट्रवादीकडून त्यांच्याही उमेदवारीची चाचपणी करण्याची शक्यता आहे. सोमठाणे गटातून आमदार माणिकराव कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे यांनी तयारी केली आहे. मात्र, सोमठाणे महिला राखीव झाल्यामुळे तेथे सिमंतिनी कोकाटे व भरत कोकाटे यांच्या पत्नी अशी चुलती-पुतणीची लढत होण्याची शक्यता आहे. पांगरी गटातून माजी आमदार सूर्यभान गडाख यांचे पुत्र राजेश गडाख व पंचायत समिती माजी सभापती काटे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषद गटांचे तालुकानिहाय आरक्षण

बागलाण तालुका

मुल्हेर : सर्वसाधारण (महिला)

ताहाराबाद : सर्वसाधारण

जायखेडा : अनुसूचित जमाती (महिला)

नामपुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग

विरगाव : अनुसूचित जमाती (महिला)

डांगसौंदाणे : सर्वसाधारण (महिला)

ठेंगोडा : अनुसूचित जमाती

ब्राह्मणगाव : अनुसूचित जमाती

मालेगाव तालुका

अस्ताने : सर्वसाधारण (महिला)

झोडगे : अनुसूचित जमाती

कळवाडी : अनुसूचित जमाती

वडेल : सर्वसाधारण (महिला)

रावळगाव : अनुसूचित जमाती

दाभाडी : अनुसूचित जमाती

सौंदाणे : सर्वसाधारण

टाकळी : अनुसूचित जमाती (महिला)

निमगाव : अनुसूचित जमाती

देवळा तालुका

लोहणेर : अनुसूचित जमाती

उमराणे : अनुसूचित जमाती

खर्डे (वाजगाव) : अनुसूचित जमाती (महिला)

कळवण तालुका

पुणदनगर : सर्वसाधारण (महिला)

मानूर : सर्वसाधारण

कनाशी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

दळवट : सर्वसाधारण

अभोणा : सर्वसाधारण

सुरगाणा तालुका

गोंदुणे : सर्वसाधारण

भदर : सर्वसाधारण

बोरगाव : सर्वसाधारण (महिला)

भोवाडा : सर्वसाधारण

पेठ तालुका

सुरगाणे : सर्वसाधारण

कोहोर : सर्वसाधारण (महिला)

कुंभाळे : सर्वसाधारण

नांदगाव तालुका

साकोरा : अनुसूचित जमाती (महिला)

न्यायडोंगरी : अनुसूचित जमाती (महिला)

भालूर : अनुसूचित जमाती (महिला)

जातेगाव : अनुसूचित जमाती (महिला)

येवला तालुका

पाटोदा : सर्वसाधारण (महिला)

नगरसुल : अनुसूचित जमाती

राजापूर : सर्वसाधारण (महिला)

अंदरसुल : सर्वसाधारण (महिला)

मुखेड : अनुसूचित जमाती

दिंडोरी तालुका

अहिवंतवाडी : सर्वसाधारण

कसबे वणी : सर्वसाधारण (महिला)

खेडगाव : सर्वसाधारण

वरखेडा : सर्वसाधारण

कोचरगाव : सर्वसाधारण (महिला)

उमराळे बुद्रुक : सर्वसाधारण

मोहाडी : सर्वसाधारण

त्र्यंबकेश्वर तालुका

बेरवळ : सर्वसाधारण (महिला)

हरसुल : सर्वसाधारण

वाघेरा : सर्वसाधारण

अंजनेरी : अनुसूचित जाती

चांदवड तालुका

धोडंबे : अनुसूचित जमाती (महिला)

दुगाव : अनुसूचित जमाती (महिला)

वडनेर भैरव : सर्वसाधारण (महिला)

वडाळीभोई : अनुसूचित जमाती (महिला)

तळेगाव रोही : अनुसूचित जाती (महिला)

निफाड तालुका

पिंपळगाव बसवंत : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

पालखेड : अनुसूचित जमाती (महिला)

लासलगाव : सर्वसाधारण (महिला)

विंचूर : अनुसूचित जाती

उगाव : अनुसूचित जमाती

पिंपळस : अनुसूचित जमाती (महिला)

कसबे सुकेणे : अनुसूचित जाती (महिला)

चांदोरी : अनुसूची जमाती

सायखेडा : अनुसूचित जमाती

देवगाव : अनुसूचित जमाती (महिला)

नाशिक तालुका

गिरणारे : सर्वसाधारण (महिला)

पिंपरी सय्यद : अनुसूचित जमाती (महिला)

पळसे : अनुसूचित जमाती (महिला)

गोवर्धन : सर्वसाधारण

लहवीत : सर्वसाधारण (महिला)

इगतपुरी तालुका

खंबाळे : सर्वसाधारण (महिला)

वाडीवर्‍हे : अनुसूचित जाती

घोटी बुद्रुक : अनुसूचित जमाती (महिला)

नांदगाव सदो : सर्वसाधारण

धामणगाव : सर्वसाधारण

सिन्नर तालुका

माळेगाव : अनुसूचित जाती (महिला)

मुसळगाव : सर्वसाधारण (महिला)

सोमठाणे : सर्वसाधारण (महिला)

पांगरी बुद्रुक : सर्वसाधारण

दापूर : सर्वसाधारण

शिवडे : अनुसूचित जमाती

नांदूर शिंगोटे : अनुसूचित जमाती

- Advertisment -

ताज्या बातम्या