“आमच्या पिढीतला एकमेव...”; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ झाले भावुक

“आमच्या पिढीतला एकमेव...”; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ झाले भावुक

मुंबई | Mumbai

अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील तळेगाव येथील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. २-३ दिवस त्यांचा मृतदेह घरात होता असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अभिनेत्याचा मृत्यू नेमका कसा झाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ७०-८० च्या दशकातील हँडसम अभिनेता म्हणून रवींद्र महाजनी यांचं नाव होतं. आपल्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येतोय. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनीही मित्राच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्यात.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना अशोक सराफ म्हणाले, “आमच्या पिढीतील एकमेव देखणा नट आम्ही गमावला. तो हिरो आणि मी सहाय्यक भूमिकेत असं आम्ही बऱ्याचदा एकत्र चित्रपटात काम केलं आहे. त्यात काही यशस्वी चित्रपटांचाही समावेश आहे. पण एक चांगला माणूस, चांगला मित्र गेल्याचं खूप वाईट वाटतंय. हसमुख चेहऱ्याचा आणि नेहमी हसत-खेळत वावरणारा तो नट होता. त्याच्यातील सर्वांत मोठा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. प्रत्येक भूमिका तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि उत्तम साकारायचा. त्याने जे काम केलं, ते मनापासून केलं. त्यामुळे त्या काळातला तो यशस्वी अभिनेता होता.”

“आमच्या पिढीतला एकमेव...”; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ झाले भावुक
राज्यात दोन उपमुख्यमंत्री... मग गावातही दोन उपसरपंच करा; पठ्ठ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रवींद्र यांनी अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. मराठीतील यशस्वी व देखणे अभिनेते असलेल्या रवींद्र महाजनींचा चित्रपटसृष्टीत येण्याचा प्रवास सोपा नव्हता. रवींद्र महाजनी यांचा जन्म १९४९ साली पुण्यात झाला होता. ते दोन वर्षांचे असताना त्यांचे वडील नोकरीसाठी मुंबईला गेले. त्यांचे वडील स्वांतत्र्यसैनिक व पत्रकार होते. रवींद्र शाळेत असल्यापासून त्यांना अभिनयाची आवड होती, मोठं झाल्यावर नाटक व सिनेमात काम करायचं हे त्यांचं स्वप्न होतं. पण, शिकत असताना ते परीक्षेत नापास झाले. त्यांना वडिलांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. रवींद्र यांनी खालसा कॉलेजमध्ये बीएसाठी प्रवेश घेतला. त्या कॉलेजमध्ये रॉबीन भट्ट, शेखर कपूर, रमेश तलवार, अशोक मेहतादेखील शिकायचे. या सर्वांनाच सिनेसृष्टीची ओढ होती. पण, वडिलांचं निधन झालं आणि रवींद्र यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. सर्वांचा सांभाळ करण्यासाठी काम करणं, पैसे कमावणं गरजेचं होतं. म्हणून रवींद्र यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. शिवाय काही लहानमोठी कामंही केली. पण त्यांच्या मनात अभिनयाची ओढ कायम होती. त्यामुळे ते दिवसा निर्मात्यांना भेटायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे. तीन वर्षे हाच त्यांचा दिनक्रम होता.

रवींद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘गोंधळात गोंधळ’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘जाणता अजाणता’ नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांनी ‘झुंज’, ‘आराम हराम आहे’, ‘देवता’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पाऊले’ यामध्ये काम केलं. मराठी शिवाय त्यांनी हिंदी, मराठी व गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. रवींद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनीदेखील उत्तम डान्सर व अभिनेता आहे, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली होती. या बापलेकाच्या जोडीने ‘पानीपत’ व ‘देऊळबंद’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मुलाच्या ‘कॅरीऑन’ चित्रपटात त्यांनी कॅमिओ केला होता.

“आमच्या पिढीतला एकमेव...”; रवींद्र महाजनींच्या निधनावर अशोक सराफ झाले भावुक
Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com