आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, म्हणाले...

भाजपा नेते आशिष शेलार
भाजपा नेते आशिष शेलार

मुंबई | Mumbai

शिंदे-फडणवीस ( Eknath shinde) सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपचे (bjp) नेते 'मविआ'ला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता मुंबईची हवा दुषित (air pollution) होण्याला मविआ सरकार जबाबदार असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

याबाबत शेलारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांना पत्र लिहिले असून त्यात म्हटले आहे की, मुंबईत रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकाच वेळी १५०० हून अधिक बांधकामे मुंबईत सुरु आहेत. यातील डेब्रिज, धूळ यामुळे मुंबईतील (Mumbai) प्रदुषण एका भयंकर टप्यावर पोहचले आहे. याला सर्वस्वी ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. लिहिलेल्या पत्रात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग’ स्थापन करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

तसेच हिवाळ्यात मुंबईतील हवेची पातळी प्रचंड घसरली व दिल्लीपेक्षा (delhi) मुंबईतील हवा अत्यंत दुषित असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुंबई भारतातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये गणले गेले. मुंबईतील या सततच्या प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि विविध शिष्टमंडळांनी मला निवेदने दिली असून याबाबत उपाय योजना करण्याची विनंती केली आहे.

तर मुंबईतील प्रदुषणात अचानक यावेळी झालेली वाढ ही बांधकामांमुळे झाली आहे. मुंबईत ५० टक्के प्रदुषण हे बांधकामांमुळे (constructions) होत आहे, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आघाडी सरकारच्या काळात बिल्डरांवर सवलतींची खैरात करण्यात आली. त्यामुळे मुंबईत मोठया प्रमाणात बांधकामे सुरू झाली. त्याचा परिणाम हवा प्रदुषणावर झाला. मुंबईत १५०० हून अधिक पुनर्विकासाचे बांधकाम प्रकल्प सुरू असून कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता या कामांच्या परवानग्या देण्यात आल्याने त्याचा फटका वातावरणाला बसला आहे.

तसेच शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, गंभीर बाब म्हणजे वातावरणातील या बदलांची नोंदी ठेवून त्यांचे वैज्ञानिक पृथ्थ्करण मुंबई महापालिका (BMC) करत नाही. त्यामुळे याबाबत सर्वंकष विचार करणे आवश्यक आहे. मुंबई आणि एमएमआरमधील प्रदुषण एका भयंकर टप्प्यावर पोहोचले असून याकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. कारणांचा शोध घेऊन उपाय योजना करणे आवश्यक आहे. असे म्हणत मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी आशिष शेलार यांनी काही सूचनाही सुचवलेल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com