
नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
बंगालच्या उपसागरात( Bay of Bengal ) ‘असनी’ चक्रीवादळ ( Asani Cyclone ) निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने गेल्या आठवड्यात वर्तवली होती. तो अंदाज खरा ठरला आहे.
हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ‘असनी’ चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत असून पाऊस पडायला सुरुवात झाली. आता हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
‘असनी’ चक्रीवादळ अंदमान द्वीपसमूहच्या पश्चिमेला सुमारे 380 किलोमीटर वायव्येकडे सरकत आहे. पुढील 24 तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या मंगळवारी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. शनिवारपर्यंत तो पूर्व-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. चक्रीवादळाला श्रीलंकेने ‘असनी’ नाव दिले आहे. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशांना प्रभाव दाखवल्यानंतर हे चक्रीवादळ बांगलादेश व म्यानमारच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचले आहे.
आग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या भागातील मच्छिमारांना मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.