
नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यात लम्पी आजाराच्या (Lumpy disease)पार्श्वभूमीवर गाय व बैलांना मोफत लसीकरणाचे ( Vaccination )आदेश असुनही खासगी पशुसंवर्धन डॉक्टर पशुपालकांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार समोर येताच जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्यांनी दणका देत हा प्रकार बंद झाला नाही तर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील,असे सांगितले.या प्रकरणी खासगी डॉक्टरांची चौकशी सुरु होताच त्यांनी संबंधित पशुपालकांना पैसे परत केल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात 8 लाख 95 हजार गायवर्गातील जनावरे आहेत. त्यातील सव्वादोन लाख गायी व बैलांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यासाठी एकूण सहा लसी उपलब्ध झाल्यामुळे शासकीय पशुसंवर्धन डॉक्टरांमार्फत लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण जनावरांची संख्या आणि लसीकरणाचे प्रमाण विचारात घेता लवकर लसीकरण पूर्ण करण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाते. त्यांना एका जनावराच्या लसीकरणामागे शासनाकडून तीन रुपये दिले जाणार आहेत.
तरीही येवला तालुक्यातील खासगी डॉक्टर शेतकर्यांकडून 20 ते 30 रुपये प्रती जनावर याप्रमाणे पैसे घेत असल्याचा तक्रारी आल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशी सुरू होताच काही डॉक्टरांनी संबंधित व्यक्तिंना पैसे परत नेऊन दिले आहेत.