Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याखंडणीसाठीच आर्यनचे अपहरण

खंडणीसाठीच आर्यनचे अपहरण

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

आर्यन खानचे (Aryan Khan) अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते. मोहित कंभोज याच्या मेहुण्याकडून सापळा रचून आर्यनला यामध्ये अडकवण्याचा डाव झाला. त्यानंतर २५ कोटीची मागणी करण्यात आली. ही डील १८ कोटीमध्ये झाली. त्यातील ५० लाख उचलण्यात आले. मात्र एका सेल्फीमुळे (Selfie) हा खेळ बिघडला. या अपहरणाचा खरा सूत्रधार मोहित कंबोज (Mohit Kamboj) असून त्यांचे आणि समीर वानखेडे ( Sameer Wankhede) यांचे चांगले संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Chief National Spokesperson of NCP Nawab Malik) यांनी रविवारी केला.

- Advertisement -

मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांच्यातील बैठकीचे व्हिडिओ (video) आम्ही समोर आणणार होतो. पण सीसीटिव्ही (cctv) फुटेज बंद असल्याने ते मिळाले नाहीत, असा खुलासाही मलिक यांनी केला. २ ऑक्टोबरला कार्डीलिया क्रुझ ड्रग्ज पार्टीवर (Cardilia Cruise Drugs Party) कारवाई करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये ३ लोकांना सोडण्यात आले. या तीन लोकांमध्येच मोठा खेळ झाला आहे, असे मलिक म्हणाले.

श्रीमंत लोकांना घाबरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम वानखेडे करत होते. आधी सांगितल्याप्रमाणे हॉटेल ‘द ललित’ मध्ये काय घडायचे हे विजय पगारे यांनी मला भेटून सांगितले. समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीकडून कशाप्रकारे हॉटेल ललितमध्ये गैरव्यवहार सुरू होता हे समोर आले. समीर वानखेडे याने शहराला ‘पाताळ लोक’ बनवले आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. ही लढाई कोणत्याही शासकीय यंत्रणेच्या विरोधात नाही की कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. ही लढाई केवळ चुकीच्या लोकांविरुद्ध आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

आर्यनला समन्स

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणासह इतर सहा प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला. त्यानंतर एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने हा तपास हाती घेतला आहे. त्यात आर्यन खान, समीर खानसह आणखी चार प्रकरणे आहेत. हे पथक तत्परतेने कामाला लागले असून या सर्व प्रकरणांतील संबंधितांची नव्याने चौकशी सुरू झाली आहे.

आर्यन खानसह अनेकांना समन्स बजावण्यात आले आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट व अचित कुमार यांना आज एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. दोघेही हजर होते. आर्यनलाही बोलावले गेले, पण प्रकृती ठीक नसल्याने त्याने वेळ मागून घेतली आहे.

आवाज दाबण्याचा प्रयत्न : कंबोज

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना मोहित कंबोज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मलिक यांनी ज्या हॉटेल व्यवसायाचा उल्लेख केला आहे तो माझा नाही. त्यांचे आरोप खोटे आहेत. दुसर्‍यांचे व्यवसाय माझे असल्याचे ते सांगत आहेत. सुनील पाटीलसोबत बोलणे झाल्याचे त्यांनी मान्य केले. ते खोटे आरोप करत आहेत.

1100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी 2014 साली निवडणूक (election) लढलो. 350 कोटींची संपत्ती असल्याचे मी स्वतः सांगितले. मी कोणता घोटाळा केला आहे याची माहिती घ्या. मी वर्षाला पाच कोटींचा कर भरतो. आरोप करून ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी तुम्हाला घाबरत नाही, असे कंबोज यांनी म्हटले आहे.

वानखेडेंचा एकच खेळ

वानखेडे यांचे नशीब चांगले म्हणून आम्हाला स्मशानभूमीजवळचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. तेथील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता. या प्रायव्हेट आर्मीचे कंबोजदेखील एक खेळाडू आहेत. ड्रग्जमाफियांना संरक्षण दिले जावे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळली जावी, ड्रग्ज घेणार्‍यांना अडकवून त्यांच्याकडूनही खंडणी वसूल करावी हा एकच खेळ वानखेडे या शहरात खेळत आहेत, असा आरोपही मलिक यांनी केला.

मंत्र्याला अडकवण्याचा डाव

मुंबईतील क्रूझ पार्टीसाठी आघाडी सरकारमधील मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. एवढेच नव्हेतर त्यांच्या मुलांनाही क्रूझवर पार्टीसाठी नेण्याचा डाव होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. मंत्र्यांना क्रूझ पार्टीवर बोलावून त्यांनाही अडकवण्याचा डाव होता का? असा सवालही मलिकांनी उपस्थित केला.

‘त्या’ चौकडीवर लक्ष ठेवा

समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग, आशिष रंजन आणि वानखेडे यांचा चालक माने या मुंबईतील विभागीय कार्यालयातील चांडाळ चौकडीवर एनसीबीने लक्ष ठेवावे. त्यांनी या विभागाची प्रतिमा बिडघवली आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशी दोन तपास पथके तयार झाली आहेत. अपहरण आणि खंडणीचा प्रकार उघड झाला आहे. हळूहळू इतरही प्रकार उजेडात येत आहेत. या प्रकरणात गोसावी, भानुशाली, सुनील पाटील, प्रभाकर सईल, वानखेडे, व्ही. व्ही. सिंग यापैकी कोणीही दोषी असल्यास त्याला शिक्षा व्हायला हवी, असे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या