अखेरी धुळे कनेक्शनमधील सुनील पाटील माध्यमांसमोर, म्हणाले...

अखेरी धुळे कनेक्शनमधील सुनील पाटील माध्यमांसमोर, म्हणाले...

मुंबई | Mumbai

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातील मास्टर माइंड सुनील पाटील (Sunil Patil) आहेत, असा आरोप भाजपा नेते मोहीत कंबोज यांनी केला होता. तसेच सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) संस्थापक सदस्य असल्याचा दावादेखील कंबोज यांनी केला. यावर आता खुद्द सुनील पाटील यांनीच माध्यमांसमोर येत सर्व आरोपांना उत्तर दिले आहे..

अखेरी धुळे कनेक्शनमधील सुनील पाटील माध्यमांसमोर, म्हणाले...
ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

सुनील पाटील म्हणाले की, या प्रकरणातील मी मास्टरमाईंड नाही. या केसचा मास्टरमाईंड कुणी वेगळाच आहे. माझा मनीष भानुशालीशी गेल्या १०-१२ वर्षांपासून संबंध आहेत. मी मनीषसोबत कंपनीच्या एका कामासाठी २७ तारखेला अहमदाबादला गेलो होतो.

किरण गोसावीसोबत मी बदली रॅकेटमध्ये आहे असे ते म्हणत आहेत. पण मी किरण गोसावीला ४ सप्टेंबरपासून ओळखतो. म्हणजे घटनेच्या काही दिवस आधीपासून. तो माझ्या मित्राचा भाऊ आहे. २२ तारखेला माझी किरण गोसावीसोबत पहिली भेट झाली. त्यानंतर मी २५-२६ ला परत आलो. २७ ला मनीष भानुशालीने सांगितले की अहमदाबादला जाऊ, काम आहे. त्यानंतर आम्ही अहमदाबादला गेलो.

सुनील पाटील यांनीच समीर वानखेडे यांना ड्रग्ज पार्टीविषयीची टिप दिल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला होता. त्यावर बोलताना सुनील पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मला अजिबात याविषयीची टीप मिळाली नाही. ही टीप मनीष भानुशालीकडे होती. त्याचा मित्र धवल भानुशाली आणि नीरज यादव यांनी संध्याकाळी ४ वाजता मला फोन केला होता.

मनीष भानुशाली आणि किरण गोसावी, नीरज यादव तेव्हा गांधीनगर मंत्रालयात गेले होते. त्यांनी सांगितले की कॉर्टेलिया क्रूजवर रेव्ह पार्टी होणार आहे. तुमचे एनसीबीचे काही काँटॅक्ट असतील, तर द्या. तेव्हा मी त्यांना सांगितले की हे माझे काम नाही. तुमचे तुम्ही पाहून घ्या, असे ते म्हणाले.

किरण गोसावीसोबत सुनील पाटील यांना फोन करणारा नीरज यादव हा भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे सुनील पाटील यांनी सांगितले आहे. “नीरज यादव मध्य प्रदेशमधील भाजपाचा कार्यकर्ता आहे. तो मोठमोठ्या नेत्यांच्या संपर्कात असतो. त्याने कैलास विजयवर्गीयांचे नाव घेतले होते. त्यांचे फोटोदेखील त्याने मला व्हॉट्सअॅप केले असल्याचे सुनील पाटील म्हणाले.

मनीषने सांगितले की शाहरुख का लडका भी है..

सॅम, मनीष भानुशाली आणि के. पी. गोसावी यांनी शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत काही डील केली होती का? या प्रश्नावर पाटील यांनी त्याचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते रात्रभर मुंबईत होते. मी ४ तारखेपर्यंत अहमदाबादलाच होतो. त्यांचा मला एकदा फोन आला की आमची बोलणी चालू आहेत. मला मनीषने सांगितले की शाहरुख का लडका भी है.. मग मी म्हटले तुम्ही बघून घ्या जे काही करायचंय ते करा. त्या दिवशी त्यांच्या बैठका सुरू होत्या. सकाळी साडेआठला मला फोन आला की आमची डील झाली आहे, ५० लाख रुपये टोकन दिले आहे. किरण गोसावी मला म्हणाला की कुठे ठेऊ. मी राहतो वाशीला, पण इथे पैसे ठेवायला जागा आहे का? तेवढंच माझे आणि प्रभाकरचे बोलणे झाले. प्रभाकरला पैसे मिळाले, त्याने कुठे ठेवले याविषयी मला काहीही माहिती नाही, असेदेखील पाटील यांनी सांगितले.

१९९९ ते २०१६ राष्ट्रवादीमध्ये कार्यरत

दरम्यान, नवाब मलिक यांनी सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला असताना त्यांनी मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो असे सांगितले आहे. मी १९९९ ते २०१६ या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो. त्यानंतर मी राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त झालो, असे त्यांनी सांगितले.

मी मयूर घुलेला कधीही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. सॅन्युअल आणि मयूर घुले हे मित्र आहेत. मयूर घुलेही तेव्हा तिथे होता. त्याचा रात्री १२ वाजता फोन आला की सॅमने सांगितले की काम झालेले नाही, पैसे परत द्या. मग मी किरण गोसावीला शिव्या घातल्या आणि म्हटलं की ते पैसे परत कर, असे सुनील पाटील म्हणाले.

सॅम डिसोजाशी संबंध?

मी वर्षभरापूर्वी सॅम डिसोजाच्या संपर्कात आलो. त्याला वर्षभरापूर्वी ओळखतही नव्हतो. तो माझ्या एका मित्राच्या माध्यमातून आमच्याकडे यायला लागला. त्याला ४ महिन्यांपूर्वी एनसीबीने (NCB) ड्रग्ज (Drugs) प्रकरणात समन्स पाठवले होते. माझ्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ते समन्स अजूनही आहे. तो एनसीबीकडे स्टेटमेंट देऊन आला होता. त्याने मला सांगितलं की मला एनसीबीला पैसे द्यायचे आहेत. २५ लाख रुपये द्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी त्याने फोन केला की मी एनसीबीला पैसे दिले आणि सुटलो आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.