Photo Gallery : शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट

1500 अधिक कलाकारांचे कलेचे सादरीकरण
Photo Gallery : शास्त्रीय संगीताने नटला गोदाघाट

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दुसर्‍या दिवशी फाल्गुन कृष्ण त्रयोदशी (प्रदोष) शके 1944 अर्थात रविवारी तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रमने गोदाघाट संगीताच्या स्वरांनी फुलला होता. निमित्त होते ते भव्य दिव्य अशा ‘अंतर्नाद’, गायन-वादन- नृत्याचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमाचे....

नाशिक शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्यक्षेत्रातील 1500 कलाकारांचा एकत्रित कलाविष्कार प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिध्द भरतनाट्यम नृत्यांगणा आणि गुरु डॉ. सुचिता भिडे - चापेकर उपस्थित होत्या. त्याचबरोबर खा. हेमंत गोडसे, नाशिक जिल्ह्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, अशोका ग्रुपचे अशोक कटारिया, श्री श्री श्री 1008 कपिकूल गुरुपीठच्या वेणूदीदी, तसेच नववर्ष स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समितीचे सचिव योगेश गर्गे, संघटक जयंत गायधनी व उपाध्यक्ष राजेश दरगोडे,नाशिक टायर्सचे तुषार सेजपाल, इच्छामणी केटरर्सचे अनिकेत गाढवे, गजानन केटरर्सचे पंकज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाडवा पटांगण गोदाघाट येथे झाला.

आयोजकांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरवात सहभागी सर्व गुरुजनांच्या सामूहिक संपूर्ण वंदे मातरमने झाली. त्यानंतर कस्तुरी तिलकम ही कृष्ण वंदना सादर केली. सहभागी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना गायन, बासरी, कथ्थक व भरतनाट्यम भावमुद्रेतून प्रस्तुत करण्यात आली. कार्यक्रमात पुढे राग दुर्गा सादर झाला, पुढे कथकच्या मुलींनी जय जगदीश्वरी माता सरस्वती ही नांदी प्रस्तुत केली. महागणपतीम मनसा स्मरामी यावर भरतनाट्यमच्या मुलींनी सादरीकरण केले. यमन राग बासरी व तबल्याद्वारे सादर करण्यात आला. त्यानंतर राग तिलक कामोद - आलाप बंदिश, छोटा ख्याल - ताल त्रिताल हा प्रस्तुत करण्यात आला.

कार्यक्रमात पुढे मालकंस राग आलाप व तानासहित मुलांनी सादर केला. देस राग, तराना - बंदिश गायन प्रस्तुत करण्यात आले. विद्यार्थ्यानी पुढे कथक तबला जुगलबंदी सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ठुमक चलत रामचंद्र, मग वेद मंत्राहून वंद्य वंदे मातरम्, त्यानंतर कानडा राजा पंढरीचा आणि शेवट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रचित जयोस्तुते या गीताने करण्यात आला.

या अंतर्नाद कार्यक्रमात शहरातील तबला, शास्त्रीय गायन, सुगम संगीत, बासरी, कथ्थक, भरतनाट्यम व ड्रम यांचे अनेक दिग्गज व प्रतिष्ठित गुरुकुल यात सहभागी झाले होते. अंतर्नाद या कार्यक्रमाचे संगीत समन्वयन हे नितीन वारे आणि नितीन पवार यांनी केले तर अंतर्नाद कार्यक्रमाचे सर्व नियोजन अंतर्नाद प्रमुख निनाद पंचाक्षरी व सहप्रमुख केतकी चंद्रात्रे यांनी पहिले. सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले. दरम्यान शिवाजी बोंदार्डे, जयेश क्षेमकल्याणी, विनायक चंद्रात्रे, रोहित गायधनी, प्रसाद गर्भे, दीपक भगत, महेश महांकाळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उद्या ‘महारांगोळी’

सोमवारी पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून महारांगोळी (25000 स्वेअर फूट रांगोळी, सकाळी 6 वाजेपासून). नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून 500 पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन सुमारे 25000 चौरस फुट रांगोळी साकारतात. त्यासाठी त्याचे रांगोळीचे कौशल विकास प्रशिक्षण राबविले जाते. या सर्व कार्यक्रमांना नाशिककर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उउपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिकचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com