Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगोेंचे आगमन

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगोेंचे आगमन

निफाड । आनंदा जाधव Niphad

सुमारे चार फूट उंची, उंच पाय, लांब चोच अन् पंखांना वरून सफेद तर खालून लाल रंग असणारा किंबहूना पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या फ्लेमिंगो Flamingo पक्षाचे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात Nandurmadhyameshwar Sanctuary आगमन झाले असून धरणाच्या बॅक वॉटर असलेल्या चापडगाव जवळील टॉवर परिसरात सध्या सहा फ्लेमिंगो पक्ष्यांचे वास्तव्य असून गुजरातमधील कच्छच्या रणातून हे पक्षी हजारो कि. मी. चा प्रवास करीत दरवर्षी या अभयारण्यात दाखल होत असतात. यंदा हे पक्ष एक-दीड महिना अगोदरच नांदूरमध्यमेश्वर येथे आले आहे. पुढील काही दिवसात फ्लेमिंगोची संख्या वाढण्याचा अंदाज पक्षीमित्रांनी वर्तवला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या भरतपूर समजल्या जाणार्‍या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात आता पक्ष्यांची संख्या वाढू लागली असून देश-विदेशातील पक्षी अभयारण्यात दाखल झाल्याने पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर गजबजला आहे. बुधवारी सकाळी येथील अभयारण्यात फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. गुजरातमध्ये हा पक्षी रोहित नावाने ओळखला जातो. तर आकाशात उडतांना लाल पंखामुळे अग्निच्या ज्वाळा पडताना दिसतात म्हणून या पक्ष्यास अग्निपंख असेही संबोधले जाते. लांब चोच व चोचीत असलेली चाळण, उंच व लाल रंगाचे पाय, सफेद मोठे पंख तर खालून लाल रंग असा हा पक्षी क्वचितच आढळतो.

हा पक्षी प्रामुख्याने समुहाने राहतो. येथील पाणथळ व दलदलीचा परिसर यामुळे भक्ष्य शोधणे सुलभ होत असल्याने शांत वातावरणात व दाट झाडी असल्याने फ्लेमिंगोसाठी हा परिसर अनुकूल असल्याने दरवर्षी हिवाळ्यात हजारो कि. मी. चा प्रवास करीत हे पक्षी या अभयारण्यात स्थलांतरीत होतात. तर मार्च महिन्यात पुन्हापरतीच्या प्रवासाला निघतात.

नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात बॅक वॉटर असलेल्या चापडगाव टॉवर परिसरात सध्या फ्लेमिंगोचे वास्तव्य दिसत असून धरण परिसरात विहार करतांना तर कुठे भक्ष्य शोधतांना हे पक्षी दिसून येतात. सध्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देश-विदेशातील जवळपास 20 हजार पक्षी आढळून येत असून यात प्रामुख्याने मछली घार, खंड्या, नदीसूरय, कमळपक्षी, पिनटेल, गार्गनी, गढवाल, ऑस्प्रे, कॉमन क्रेन, नॉर्यन शॉवलर, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यू, हॅरियर, ब्लू थ्रोड, गोल्डन फ्लॉवर, खंड्या, जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, स्पॉटबील डक, राखी बगळा, उघड्या चोचीचा बगळला, जांभळा बगळा, स्पुनबिल रिव्हीर टर्न, प्रॉन्टिकोल, दलदल ससाणा आदी पक्षी दिसून येतात. सध्या ढगाळ हवामानामुळे येथील पर्यटकांची संख्या कमी असून डिसेंबर पासून हे अभयारण्य पर्यटकांनी गजबजण्याची शक्यता आहे. पक्षांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने फेब्रुवारीत पर्यटकांना येथे पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे.

अभयारण्यात 19 हजारांपेक्षा जास्त पक्ष्यांचा मुक्काम

फ्लेमिंगोचे मुख्य खाद्य म्हणजे शेवाळ, किटक व मासे असून यावर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच धरणातील पाण्याची लेवल टिकून राहिली. पाणथळ जागेमुळे भक्ष्य शोधणे सुलभ होते. त्यामुळे यावर्षी फ्लेमिंगोसाठी एक महिला अगोदरच अनुकूल कालावधी तयार झाल्याने फ्लेमिंगोचे या अभयारण्यात लवकर आगमन झाले असून सध्या येथील अभयारण्यात देश-विदेशातील सुमारे 19 हजारांपेक्षा जास्त पक्षी आढळून येतात.

संदीप काळे, वनरक्षक (नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य)

- Advertisment -

ताज्या बातम्या