Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedशरद पवारांबद्दलच्या या सात गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

शरद पवारांबद्दलच्या या सात गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

भारतीय राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसा सांगणारे शरद पवार गेली सात दशके देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. १२ व्या महिन्याच्या १२ तारखेस जन्मलेले शरद पवार यांच्यासंदर्भातील हे सात किस्से…

दुसरीत असतांना केले पहिले भाषण

शरद पवार यांनी पहिले भाषण दुसरीत असताना केले. काटेवाडीच्या शाळेत भाषण करण्यासाठी त्यांना ६ मिनिटांचा वेळ दिला होता. ६ मिनिटांनंतर दोन-तीन वेळा बेल वाजली. १० मिनिटे होऊन गेली. पण त्यांचे भाषण थांबेनात. अखेर गुरुजींनी सदरा खेचत त्यांना थांबवले. तेव्हापासूनच भाषण करण्याची गोडी लागील आणि ती आजवर तशीच आहे.

- Advertisement -

अन् नेमाडेंनी कोसला लिहिली

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नियतकालिकेत भालचंद्र नेमाडे यांची एक कविता पवारांनी वाचली. ती कविता वाचून पवार त्यांना भेटायला गेले. अशा फुटकळ कथा-कविता लिहून स्वतःची प्रतिभा वाया घालू नकोस. ही कादंबरी घे आणि असे काही तरी लिही, असे त्यांनी सांगितले. नेमाडे यांना त्यांनी इंग्रजी वर्तुळात फार गाजत असलेल्या जे. डी. सालिंजर यांची ‘कॅचर इन द रॉय’ची प्रत तेव्हा दिली होती. त्यामुळेच नेमाडे यांच्याकडून ‘कोसला’ लिहिली गेली. पवारांचा होरा किती अचूक होता हे नेमाडेंनी आणि ‘कोसला’नेही पुढे सिद्ध केले.

पुलंना दिला नोकरी सोडण्याचा सल्ला

पवारांनी पुलं यांचे ‘बटाट्याची चाळ’ हे पुस्तक वाचले. मग पुलंविषयीची सर्व माहिती गोळा केली त्यांना भेटायला गेले. ते पुलंना म्हणाले, ‘मी वयाने तुमच्यापेक्षा खूप लहान आहे; परंतु बटाट्याची चाळ हे वाचायचे पुस्तक नसून ऐकायचे पुस्तक आहे. तुम्ही यावर एकपात्री करा. मराठी माणूस उगाच नोकरी नोकरी करत बसतो, तुम्ही नोकरी सोडा आता. लोक हे पुस्तक ऐकायला गर्दी करतील.’ पुलंनी १९६१मध्ये नोकरी सोडून पूर्ण वेळ साहित्याचा संसार सुरू केला. तो पवारांच्या या सांगण्यावरूनच.

अन् पवार को-पायलट बनले

२०१४च्या लोकसभा निवडणुकीपुर्वी पवार उस्मानाबाद येथे मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आले होते. परंतु अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने दौरा रद्द करून नुकसानीची पाहणी करण्यास सुरुवात केली. उस्मानाबादमधील पाहणीनंतर परभणीकडे जात असताना अचानक पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. त्यामुळे वातावरण योग्य नसल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्याची गरज असल्याचे पायलटने सांगितले. पण आपण कुठल्या भागात आहोत हे स्वत: पायलटला देखील समजत नव्हते. पवारांनी मग पायलटला सांगितले की, ‘तू हेलिकॉप्टर खाली घे आणि जरा दोन-चार चक्कर मार. पायलटने हेलिकॉप्टर एका गावाभोवती फिरवण्यास सुरुवात केली. त्यावेळी शरद पवारांनी हा भाग नेमका कोणता आहे हे तात्काळ ओळखले. पवार म्हणाले, ‘हे अंबाजोगाई आहे. तिथं हेलिपॅड नक्की असणार. त्यामुळे पायलटने हेलिकॉप्टर आणखी खाली घेतले. त्यावेळी त्यांना H दिसले आणि पायलटने तात्काळ हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग केले.

अंगावरुन साप गेला

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असतांना शरद पवार भीमाशंकरला गेले होते. एका खोलीत त्यांचा राहण्याची सोय केली होती. रात्री एकच्या सुमारास त्यांना काही हालचाल जाणवली. ते उठून बसले. तेव्हा त्यांच्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर गेला. मग त्यांनी दत्तात्रय पाटील ( दिलीप वळसे पाटील यांचे वडील) यांना हाक मारली आणि घडलेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकून दत्तात्रय पाटील यांना आनंदाने उकळ्या फुटल्या. ते म्हणाले, हा शुभशकुन आहे. आपण उद्या मंदिरात पूजा करू. त्यांचा सल्ला ऐकून पवारांनी पूजा केली. (पवार फारशे मंदिरात जात नाहीत) त्यांनंतर दोघेही मुंबईला परतलो. त्याच दिवशी विधानसभेत अशा काही घडामोडी घडल्या त्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आठ दिवसांत ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवार नाही पण त्यांची पत्नी प्रतिभाताई सातत्याने भीमाशंकरला जातात.

घाशीराम असे पोहोचले जर्मनीत

ज्येष्ठ नाट्यकर्मी विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा प्रयोग १९८० च्या दशकात जर्मनीत होणार होता. पण या नाटकाला काहींचा विरोध होता. नाटकातील कलाकर मंडळी पुण्यात राहत होती. जर्मनीला विमानाने जाण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणे आवश्यक होते. विरोध करणाऱ्यांनी शिवसेनेच्या मदतीने पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीजवळ गाड्या अडवण्याची योजना आखली. ही माहिती डॉ. जब्बार पटेल यांना कळाली. त्यांनी आणि डॉ मोहन आगाशे यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली. किर्लोस्कर समूहाचे चंद्रकांत किर्लोस्कर यांच्याशी पवारांचे मैत्रीचे संबंध होते. पवारांनी किर्लोस्करांना अडचण सांगितली आणि ताबडतोब ‘घाशीराम कोतवाल’च्या टीमसाठी पुणे-मुंबई चार्टर विमानाची सोय केली.

असे सुरु झाले IPL

शरद पवार हे २००५ ते २००८ या काळात BCCIचे अध्यक्ष होते. त्यावेळी भारतामध्ये IPL सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले, पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळाले नसते, तर हे केवळ अशक्य होते, असे शास्त्री यांनी एका व्याख्यानात सांगितले. शास्त्री म्हणाले, ‘IPLसंदर्भात होणाऱ्या प्रत्येक बैठकीला शरद पवार आपल्या हातात फायलींचा गठ्ठा घेऊन येत होते. त्यातील प्रत्येक पान त्यांनी वाचलेले असे. त्यांचा अभ्यास पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे निरीक्षण हे सूक्ष्म आणि दृष्टी व्यापक असल्यामुळेच भारतात IPL सुरू झाले’

- Advertisment -

ताज्या बातम्या