
मुंबई | Mumbai
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या (colleges) प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक (Assistant Professor), प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपालांची पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यावेळी म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल – १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक – १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती.
या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (Minister of Higher and Technical Education) चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत (Assembly) सांगितले.