Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या‘हर घर तिरंगा’ मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

भारतीय स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सवी वर्ष अविस्मरणीय बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हर घर तिरंगा’ मोहीम ( Har Ghar Tiranga Campaign) देशात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health and Family Welfare Dr. Bharti Pawar) यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबाबत आयोजित आढावा बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपजिल्हाधिकारी तथा हर घर तिरंगा मोहिमेचे नोडल अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतांना देशपातळीवर अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या थोरपुरुषांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी एकसंघपणे ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. जेणेकरून भविष्यकाळातील पिढ्यांना या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून देशभक्तीची प्रेरणा मिळेल.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हा प्रशासनामार्फत हर घर तिरंगा मोहिमेच्या नियोजनाची माहिती देतांना सांगितले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाभरात ही मोहिम राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा, नाशिक महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका यांच्याशी समन्वय साधून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 12 लाख झेंडे वितरित करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांना झेंडे वितरित करण्यात येत आहेत.

याबैठकीत पोलीस आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य यंत्रणा, कृषी विभाग, जिल्हा क्रीडा विभाग यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यासाठी केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना दिली.

दोन दिवसांत 13 हजार झेंड्यांची विक्री

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान तिरंगा प्रत्येक घरावर फडकवण्यात येणार आहे. नाशिक शहरात दोन लाख घरांवर तिरंगा झेंडा लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने त्याची विक्री सर्व विभागीय कार्यालय माध्यमातून होत आहे. दोन दिवसांमध्ये 13456 झेंडे विक्री झाली आहे. सर्वाधिक पश्चिम विभागात विक्री झाले आहे.

शहरातील सर्व सहा विभागीय कार्यालयांमध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले असून परिसरातील घरांची संख्यानुसार त्यांना झेंडे उपलब्ध करून देण्यात आले. दरम्यान येत्या सोमवारी 8 तारखेला महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शहरातील महत्त्वाच्या विविध संस्थांची बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये त्यांच्याकडील सीएसआर फंडाच्या माध्यमातून त्यांनी महापालिकेकडून किमान 50 हजार झेंडे विकत घेऊन त्याचे वितरण नागरिकांमध्ये करावे, असा उद्देश महापालिकेचा आहे. तर सुमारे दीड लाख झेंडे हे महापालिकेच्या माध्यमातून विक्री होणार आहे. प्रत्येक विभागात एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपली मागणी तिकडे नोंदवून आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी, तर 21 रुपये देऊन झेंडा खरेदी करायचा आहे तसेच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तो आपल्या घरावर किंवा इमारतीवर फडकवायचा आहे.

झेंड्याची विक्रीमध्ये पश्चिम विभाग आघाडीवर आहे. 5676 झेंडे या विभागात आतापर्यंत विकले गेले आहे. तर पंचवटी विभागात 2933, पूर्व विभागात 1424, नाशिकरोड विभागात 331, नवीन नाशिक विभागात 61 तर सातपूर विभागातून 3033 याप्रमाणे झेंडे विक्री झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या