लॉकडाऊनची आज घोषणा?

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार संवाद
लॉकडाऊनची आज घोषणा?

मुंबई । प्रतिनिधी

करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्ण संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी यासंदर्भातील घोषणा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे, गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हा बंदी लागू करायची किंवा कसे? याबाबत आज रात्री चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात करोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, ऑक्सिजनची कमतरता आणि औषधांचा तुटवडा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने गेल्या वर्षीप्रमाणे कडक लॉकडाऊन करावा, अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत झाली. या मागणीला उद्धव ठाकरे यांनी अनुकूलता दाखवली.

लॉकडाऊन लागू करताना कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, कोणत्या बंद करायच्या याबाबत आज निर्णय होईल. आजच्या निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना जारी झाल्यानंतर आजच्या सूचना रद्द होतील, असे परब यांनी सांगितले.

तर कठोर निर्बंध, विकेंड लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी लागू करूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्रात काही तासात लॉकडाऊन जाहीर होऊ शकेल, असे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी बैठकीनंतर सांगितले.

परदेशी लस खरेदीसाठी केंद्राला मागणी करणार

राज्यातील लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशातून कोरोना प्रतिबंधित लस खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्याचा निर्णय कालच्या बैठकीत झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. परदेशातून लस खरेदी करण्याची परवानगी मिळाली तर राज्यात १८ ते ४५ वर्ष वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण वेगाने पूर्ण करण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प

करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे, कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा काढण्याची वाट न बघता ठाणे, कोल्हापूरचा आधार घेऊन निर्णय करावा. प्रकल्प उभारण्यात व्यत्यय येऊ नये, दिरंगाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

तर, राज्य सरकारने स्वतःचा ३०० मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. हा प्रकल्प कोरोना पश्चातही सरकारच्या उपयोगा येऊ शकतो, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com