गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा कार्यक्रम जाहीर

गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा कार्यक्रम जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ( Local Body Elections )जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक पूर्वतयारीलाही वेग आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार गट व गण प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम 23 मेपासून सुरू होऊन 27 जूनला अंतिम प्रारूप आराखडे जाहीर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत संभ्रमावस्था होती. त्यातून आता मार्ग निघणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission )फेब्रुवारी 2022 मध्ये राबवलेला गट-गण प्रारूप आराखडा कार्यक्रम रद्द केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारूप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यात आता गट-गणांचे प्रारूप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत संभ्रमावस्था होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनही गट व गणांचे प्रारूप आराखडे तयार करण्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू होते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये गट व गण रचनेबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर पुढे काहीही कार्यवाही झाली नाही व अचानक 5 फेब्रुवारीला सर्व जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून गट व गणरचनेचे प्रारूप आराखडे तयार करून पाठवण्याचे आदेश आले.

त्यानुसार पाठवलेल्या प्रारूप आराखड्यांची तपासणी सुरू असतानाच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार स्वत:कडे घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने प्रारूप आराखडे तयार करण्याचे काम स्थगित केले. त्यानंतर 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे अधिकार पुन्हा निवडणूक आयोगाला देऊन दोन आठवड्यांमध्ये निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले.

यामुळे राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारीत तयार केलेले प्रारूप आराखडे पडताळणीसाठी बोलावले. मात्र पुढील कोणतेही आदेश दिले नाहीत. यानंतर 10 मे रोजी गट-गणरचनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याचे सुधारीत आदेश काढले आहेत. या सुधारीत आदेशांनुसार आता प्रारूप आराखडे जिल्हाधिकारी पातळीवरच तयार करून त्यांना विभागीय आयुक्तांकडून अंतिम मान्यता घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रारूप आराखडा तयार करण्याच्या प्रत्येक टप्प्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला कळवणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता नव्याने गट, गणरचना करावी लागणार आहे.

प्रारूप आराखडा कार्यक्रम

1) जिल्हाधिकार्‍यांनी गट-गण प्रारूप रचनेचा प्रस्ताव तयार करून तो विभागीय आयुक्तांना पाठवणे : 23 मे 2022

2) विभागीय आयुक्तांनी प्रारूप गट-गण रचना प्रस्तावास मान्यता देणे : 31 मे 2022

3) जिल्हाधिकार्‍यांनी प्रारूप गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे : 2 जून 2022

4) जिल्हाधिकार्‍यांकडे प्रारुप रचनेस हरकत व सूचना नोंदवणे : 2 ते 8 जून 2022

5) विभागीय आयुक्तांनी हरकत व सूचनांवर सुनावणी होऊन गट-गणरचना अंतिम करणे : 22 जून 2022

6) अंतिम गट-गण रचना राजपत्रात प्रसिध्द करणे : 27 जून 2022

नगरपरिषदांचा प्रभागरचना कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांचा समावेश

निवडणूक आयोगाने राज्यातील 207 नगरपरिषदांचा प्रभागरचना कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील भगूर, मनमाड, नांदगाव, येवला, चांदवड, सटाणा व सिन्नर नगरपरिषदांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी 10 मेपासून हरकती प्रभागरचनेवर हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत. तर 6 जूनला अंतिम प्रभागरचना जाहीर केली जाईल.

दरम्यान, राज्यात एप्रिल 2020 ते मार्च 2022 याकाळात मुदत संपुष्टात आलेल्या तसेच मुदत संपणार्‍या नगरपरिषदांचा सुधारित प्रभागरचना कार्यक्रम घोषित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 4 मे रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र कार्यक्रम घोषित करताना आयोगाने 10 मार्चपासून प्रारूप प्रभागरचनेवर प्राप्त झालेल्या आक्षेप व हरकतींसह सुधारीत कार्यक्रमानुसार नव्याने प्राप्त होणार्‍या आक्षेप व हरकतींवर सुनावणी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.

आयोगाच्या नवीन कार्यक्रमानुसार नागरिकांना 10 ते 15 मे या कालावधीत हरकती व सूचना नोंदवता येतील. तर 23 तारखेपर्यंत दाखल हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी सुनावणी देतील. दरम्यान, राज्य निवडणूक आयोग 6 जूनला अंतिम प्रभागरचनेस मान्यता देतील. तर 7 जूनला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचनेला प्रसिद्धी देतील.

Related Stories

No stories found.