Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआनंद महिंद्रांनी केली अग्निवीरांसाठी 'ही' मोठी घोषणा

आनंद महिंद्रांनी केली अग्निवीरांसाठी ‘ही’ मोठी घोषणा

मुंबई । Mumbai

केंद्र सरकारच्या (Central Government) अग्निपथ लष्करी भरती योजनेला (Agneepath Scheme) बिहार, झारखंड, यूपीसह अनेक राज्यांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात तरुण रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून सातत्याने आंदोलने केली जात असून देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यातच आता महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अग्निवीरांसाठी एक मोठी घोषणा केली आहे…

- Advertisement -

यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आणि निराश झालो आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीरला मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्याला उल्लेखनीयपणे रोजगार सक्षम बनवतील. महिंद्रा ग्रुप (Mahindra Group) अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना आमच्यासोबत भरती (नोकरी) करण्याची संधी देईल.” असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच आनंद महिंद्रा यांना असेही विचारण्यात आले होते की, ते अग्निवीरांना कंपनीत कोणते पद देणार आहे? यावर त्यांनी म्हटले की, “लीडरशिप क्वॉलिटी, टीम वर्क आणि शारीरिक प्रशिक्षणामुळे अग्निवीरच्या रूपाने इंडस्ट्रीला बाजारपेठेसाठी तयार व्यावसायिक मिळेल. हे लोक अॅडमिनिस्ट्रेशन, सप्लाय चेन मॅनेजमेंटची कामे कुठेही करू शकतात.” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही दलांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला. लष्कराने सांगितले की, ‘अग्नवीर’ ही भारतीय सैन्यात एक वेगळी श्रेणी असेल आणि ते कोणत्याही रेजिमेंटमध्ये भरती केले जाऊ शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या