राहत्या घरात वृध्द दाम्पत्याचे मृतदेह आढळले; घातपाताचा संशय

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
राहत्या घरात वृध्द दाम्पत्याचे मृतदेह आढळले; घातपाताचा संशय

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरातील हिंगलाजनगर( Malegaon- Hinglajnagar) भागात वृध्द दाम्पत्याचे मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळून आले. पत्नीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत तर पतीचा मृतदेह बेडवर जखमी अवस्थेत वेगवेगळ्या खोलींमध्ये आढळून आले. घरातून पहाटेच्या सुमारास धूर निघू लागल्याने हा प्रकार उघडकीस आला.

या घटनेने संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून हा प्रकार हत्येचा की आत्महत्येचा याची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह संधू, शहर पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रिती सावंत यांनी धाव घेत घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी प्राथमिक नोंद करण्यात आली असली तरी सर्व शक्यता तपासून पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहे.

शहरास पहाटेच्या सुमारास हादरा देणार्‍या या घटनेची अधिक माहिती अशी की, हिंगलाजनगर सर्व्हे नंबर 55 मध्ये ताज बेकरीच्या मागे अल्ताफ हुसेन मोहंमद सईद (70) व त्यांची पत्नी अलकमा अल्ताफ हुसेन (68) हे वृध्द दाम्पत्य एकटेच राहत होते. त्यांचा इंजिनिअर असलेला मुलगा पुणे येथे नोकरीस आहे. तर तिन्ही लग्न झालेल्या मुली घरालगत वास्तव्यास असल्याचे बोलले गेले.

आज पहाटेच्या सुमारास अल्ताफ हुसेन यांच्या घरातून धूर निघू निघत असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरातील नागरीकांनी घराकडे धाव घेत आग विझविण्यास प्रारंभ केला. मात्र यावेळी एका खोलीत बेडवर जखमी अवस्थेत अल्ताफ हुसेन यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसर्‍या खोलीत त्यांची पत्नी अलकमा यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आला.

आगीमुळे घरातील इतर साहित्य देखील जळाल्याने त्याचा धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच नागरीक हादरले. त्यांनी या घटनेची माहिती लगतच राहत असलेले त्यांचे जावई शेख मोईन व मुलीस दिली. या घटनेची माहिती मिळताच अ.पो. अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलीस अधिक्षक तेगबीरसिंह सिंधू, सपोनि प्रिती सावंत आदी अधिकार्‍यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. अल्ताफ व अलकमा या दाम्पत्याचा मृतदेह मिळून आल्याने परिसरात शोककळा पसरून घटनास्थळी नागरीकांची एकच गर्दी झाली होती.

पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केल्यानंतर दोघांचे मृतदेह सामान्य रूग्णालयात रूग्णवाहिकेव्दारे उत्तरीय तपासणीसाठी पाठवले होते. मात्र नंतर या दाम्पत्यांचे मृतदेह नाशिक येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्याचा निर्णय पोलीस अधिकार्‍यांतर्फे घेण्यात आला.

घरात वृध्द दाम्पत्य एकटेच राहत होते. वरचा मजला त्यांनी भाड्याने दिला होता. अल्ताफ हुसेन व अलकमा हे दोन्ही मनमिळावू स्वभावाचे होते. गरीबांना जेवण देण्यासह त्यांच्या उपचारासाठी ते सतत सहाय्य करीत असत. त्यामुळे हिंदू-मुस्लीम जनतेत ते लोकप्रिय होते. या दाम्पत्याचे मृतदेहच आढळून आल्याने परिसरातील नागरीक शोकाकुल झाले आहेत. दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोलीत आढळून आले.

अल्ताफ यांच्या डोक्यास मार तर पत्नी अलकमा या अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यामुळे हा प्रकार घातपाताचा असण्याची शंका नातेवाईकांसह परिसरातील नागरीकांतर्फे व्यक्त केली जात होती. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांतर्फे नातेवाईक व शेजारी राहणार्‍या रहिवाशांची चौकशी व जबाब नोंदवून घेतले जात असून सर्व शक्यता तपासून पोलिसांतर्फे या घटनेची चौकशी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com