Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकिरकोळ महागाईत वाढ

किरकोळ महागाईत वाढ

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यात ऑगस्टच्या तुलनेत महागाईच्या दरात 0.41 टक्के वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्के इतका होता. एप्रिलनंतरची महागाईतील ही सर्वात मोठी वाढ आहे.

- Advertisement -

खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई वाढल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिना हा सलग नववा महिना आहे ज्यात महागाईचा दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने चलनवाढीचा दर 6 टक्के निश्चित केला आहे, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हा दर 7 टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. नुकतीच रिझर्व्ह बँकेने या दराबाबत चिंता व्यक्त केली होती.

रिझर्व्ह बँक फक्त किरकोळ महागाईच्या आधारावर रेपो दर वाढवते. महागाई अशीच सुरू राहिल्यास रिझर्व्ह बँकेला रेपो दरात पुन्हा वाढ करावी लागेल. यामुळे कर्जाचे व्याजदर महाग होणार असून ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. महागाई ऑगस्टच्या तुलनेत जास्त किरकोळ महागाईची अधिकृत आकडेवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. हा आकडा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजेच सीपीआयच्या आधारे जाहीर करण्यात आला आहे.

सप्टेंबरमध्ये सीपीआयवर आधारित महागाई 7.41 टक्के आहे. बरोबर एक वर्षापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये हा दर 4.35 टक्के होता. ऑगस्टमध्ये हा दर 7 टक्के होता. खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ हे या महागाईमागील खरे कारण असल्याचे बोलले जात आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर ऑगस्टमध्ये 7.62 टक्के इतका होता. तर सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे.

6 टक्क्यांची मर्यादा ओलांडली

महागाईचा दर 6 टक्कयांच्या वर राहिल्याने आरबीआयला आता केंद्र सरकारसमोर एक अहवाल सादर करावा लागेल ज्यामध्ये दोन्ही बाजूंनी 2 टक्क्यांच्या फरकासह 4 टक्के महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरण्याची कारणे स्पष्ट करावी लागणार आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला किरकोळ महागाई 2 ते 6 टक्कयांच्या दरम्यान असावी याची खात्री करण्यास सांगितले आहे. पण त्याचा दर 7 टक्के आणि त्याहून अधिक दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या