Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात सायबरदुतांची फौज; 1000 दूत गुन्हेगारी रोखणार

नाशकात सायबरदुतांची फौज; 1000 दूत गुन्हेगारी रोखणार

नाशिक । फारुक पठाण Nashik

मागील काही काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अर्थात सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्याला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष प्रयत्न करीत असले तरी असे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीची मोठी गरज असल्याने नाशिक पोलीस आयुक्तालयाच्यावतीने सायबर गुन्हे रोखण्यासाठी तब्बल 1000 सायबर दूत तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली. आतापर्यंत 300 सायबर दुतांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून लवकरच दुसर्‍या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून वाढलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी शहर पोलिसांनी असे गुन्हे रोखण्यासाठी शालेय विद्यार्थी व शिक्षकांना सायबर साक्षर करून सायबरदूत बनविले आहे. हे विद्यार्थी सायबर गुन्ह्यांविरोधी जनजागृती करणार आहेत. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयात 27 कॉलेजचे 300 विद्यार्थी व प्राध्यापक यांना सायबरदूतचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस मुख्यालयातील भिष्मराज बाम सभागृह येथे सायबर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर गुन्हयांचे प्रकार व ते रोखण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्याकडून माहिती देऊन सायबर साक्षर करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र व सायबरदुत बॅचही देण्यात आले आहे. सायबरदूत म्हणून भूमिका बजावण्याचे व त्यांचे कॉलेज, राहता परीसर तसेच, समाजात सायबर जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. यासाठी त्यांना सायबर पोलीस ठाण्यातर्फे मदत देण्यात येणार असल्याचे उपायुक्त बच्छाव यांनी सांगितले. नाशिक सायबर पोलीस ठाण्यातर्फे सायबरदुतांकरिता भविष्यात कॅप्सुल कोर्सेसचे आयोजन करण्यात येणार असून ‘सायबरदूत’ हा उपक्रम या पध्दतीचा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.

जनजागृती गरजेची

सध्या फोनद्वारे तसेच इंटरनेटद्वारे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करीत आहेत. मागील काही काळात नोकरीचे आमिष दाखवून किंवा महिलांना घरगुती काम देण्याचे आमिष दाखवून तर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन व इन्शुरन्सचे पैसे जास्त मिळवून देण्याचे आमिष दाखवून, विद्युत बिल थकले आहे, त्वरित इलेक्ट्रिकल ऑफिसरशी संपर्क करा, असे मेसेज टाकून फसवणूक करण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती झाल्यास अशाप्रकारे फ्रॉड कॉल किंवा मेसेज आल्यावर नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतील व गुन्हेगारी रोखण्यात मदत होणार आहे. म्हणून पोलीस आयुक्तांच्या वतीने सायबरदूत ही संकल्पना आणली गेली असून त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. त्यात सायबर गुन्हेगारी देखील वाढत आहे. अशा वेळेला नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यास नक्कीच सायबर गुन्हे रोखण्यात आपण यशस्वी ठरू शकतो. म्हणून सायबरदूत ही संकल्पना अस्तित्वात आली आहे. लवकरच दुसर्‍या टप्प्याचे प्रशिक्षण होणार आहे.

प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त (गुन्हे), नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या