होळी, धूलिवंदन साधेपणाने साजरा करण्याची सूचना

राज्य सरकारच्यावतीने आवाहन
होळी, धूलिवंदन साधेपणाने साजरा करण्याची सूचना

मुंबई | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वधर्मीय सण, उत्सव तसेच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एकत्रित येऊन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. त्यामुळे यावर्षी ‘होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.या संदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

होळी,शिमगा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी २८ मार्चला होळीचा सण आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. रंगपंचमी हे सण साजरे करताना दरवर्षी या सणानिमित्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतू करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.

होळी, शिमगा सणाच्या निमित्ताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदीरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरिता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच होळी आणि धुलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत, असे राज्य सरकारने या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com