
अमरावती | Amravati
अमरावती पदवीधर मतदारसंघात (Amravati Division Graduate Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील (Dhiraj Lingade Patil) यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.
तब्बल ३० तासानंतर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीत मविआच्या धीरज लिंगाडेंना ४६ हजार ३४४ तर, भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना केवळ ४२ हजार ९६२ मते मिळाली आहेत.
काल दुपारी धीरज लिंगाडे हे २ हजार मते घेऊन आघाडीवर आहेत. एकूण २८ पैकी १८ टेबलांवरील मतमोजणीत लिंगाडे आघाडीवर होते. भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. तब्बल ८ हजार अवैध मते आढळून आल्याने पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेर मतमोजणी सुरू केल्याने हा निकाल रखडला गेला होता.
पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी धीरज लिंगाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारांचे प्रश्न यावर धीरज लिंगाडे यांना मतदान खेचून आणण्यात यश आले.
तर भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांचा सर्वसामान्य मतदारांशी संपर्क तुटला होता. त्यांच्याबद्दल पक्षांतर्गतही मोठ्या प्रमाणात नाराजी होती. कार्यकर्त्यांवर त्यांनी अविश्वास दाखवला होता. गृहराज्यमंत्री असताना डॉक्टर रणजीत पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला होता.