Deshdoot Special : अमित ठाकरेंचे नाशिकवर विशेष लक्ष; सलग दौर्‍यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Deshdoot Special : अमित ठाकरेंचे नाशिकवर विशेष लक्ष; सलग दौर्‍यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

नाशिक । फारूख पठाण | Nashik

आगामी लोकसभा, विधानसभा (Lok Sabha and Legislative Assembly) तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढणार, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. तेव्हापासून राज ठाकरेंसह युवानेते अमित ठाकरे (Amit Thackeray) सतत राज्यभर फिरुन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरेंचे विशेष लक्ष सध्या नाशिकवर असल्याचे दिसत आहे. गत १० दिवसांत त्यांनी दोनदा शहरात हजेरी लावल्याने मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मंगळवारी नाशिक दौर्‍यावर (Nashik Tour) आलेले अमित ठाकरे यांनी नाशिक शहरातील आणि नाशिक लोकसभा मतदार संघातील नाशिक, भगूर देवळाली कॅम्प, सिन्नरमध्ये (Sinnar) तब्बल ३८ गणेश मंडळांना भेट देऊन आरती केली. सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत ते सतत लोकांच्या संपर्कात होते....

राज्यातील सर्व पक्षांनी मुंबई महापालिकेसह राज्यात विविध ठिकाणी होणार्‍या महापालिका निवडणुकांकडे (Municipal Elections) लक्ष केंद्रित केले आहे. त्यातच नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) २०१२ ते २०१७ या काळात पाच वर्ष सत्ता भोगणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील जोमाने कामाला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकला येऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहे, तर आता पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे महिन्यातून दोनदा नाशिकला (Nashik) येत आहे. त्यामुळे मनसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील मरगळ झटकण्यासाठी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, जोश निर्माण करण्यासाठी अमित ठाकरे यांचे दौरे उपयोगी ठरत आहे.

मनपात मनसेनेची (MNS) सत्त्ता असतांना विविध औद्योगिक संस्थांच्या मदतीने सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण, महामार्गाची देखभाल, उद्याने, बॉटनीकल गार्डन, गोदापार्क, लेझर शो असे अनेक उपक्रम आणले. स्वतः राज ठाकरे यांनी त्यासाठी परिश्रम घेतले होते. मात्र, भाजप सत्तेवर येताच नवी कामे झाली तर नाहीत. उलट मनसेनेच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता ठाकरे आपल्या दौर्‍यात स्थानिक पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांशी वन टू वन संवाद साधत सत्ता काळात नाशिक शहरात झालेल्या विकासकामांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे टार्गेट देत आहे. दरम्यान अमित ठाकरेंचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होत असून नवीन नाशिक भागातील त्रिमुर्ती चौकात आल्यावर महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील यांच्यासह महिला पदाधिकार्‍यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com