सोशल मीडियामुळे काँग्रेसची अशी झाली पंचाईत

अमित शाह
अमित शाह

नवी दिल्ली:

सोशल मीडियावरील पोस्टवर विश्वास ठेवल्यामुळे काँग्रेसची लोकसभेत चांगलीच पंचाईत झाली. काँग्रेसच्या या धोरणामुळे पक्षाच्या नेत्यांना लोकसभेत अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागले.

पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतन येथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसण्याचा उद्दामपणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला, अशी अफवा पश्चिम बंगालमध्ये सोशल मीडियावरुन पसरली. या माहितीची शहानिशा न करता काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत हा विषय उपस्थित केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आरोपांना उत्तर देण्यासाठी लोकसभेत उभे राहिले. त्यांनी काँग्रेसचा आरोप फेटाळला. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना मी शांती निकेतन येथे जाऊन आलो. पण तिथे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जागेवर बसण्याची कृती केली नाही. ही कृती देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी या दोघांनी केली, असे अमित शहा म्हणाले. हे वक्तव्य करताना त्यांनी शांती निकेतन संस्थेचे उपकुलपती यांचे पत्र आणि फोटो सादर केले. शांती निकेतन प्रकारात आरोपांची नोंद कामकाजात झाली असल्यामुळे मी केलेल्या वक्तव्याची नोंदही पुराव्यांसह कामकाजात करुन घ्यावी, अशी विनंती अमित शहा यांनी लोकसभाध्यक्षांना केली. याआधी टागोरांच्या खुर्चीवर बसलेले नेहरू आणि रवींद्रनाथ टागोर ज्या सोफ्यावर बसायचे तिथे त्या जागेवर बसून चहा पीत असलेल्या राजीव गांधींचा फोटो अमित शहा यांनी सभागृहात सादर केला. यानंतर काँग्रेस नेत्यांची शांती निकेतन प्रकरणात पंचाईत झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com