जुने नाशिक । प्रतिनिधी

शहरातील आयोजित एका बहुचर्चित मिसळ पार्टी आज पार पडली. यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांसोबत भाजप नेत्यांनी एकमेकांशी हितगुज करत तर्रीदार मिसळवर ताव मारला...

मिसळ पार्टीचे आयोजन भाजप नेते वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर केले होते. ‘मिसळ पार्टीची एकीकडे चर्चा असताना दुसरीकडे स्वत: गीते यांच्या पक्षांतराची चर्चादेखील गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे.

दरम्यान, आपण भाजपमध्येच असून पक्षाचे काम करत राहू, पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नसतो असे गीते म्हणाल्यामुळे उधाण आलेल्या चर्चांना पूर्णविरामदेखील त्यांनी एकप्रकारे दिलाय. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आपले पुढचे ‘मिशन महापालिका’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात घरवापसी केली. त्यानंतर भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आता भाजप नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केल्याने मिसळ पार्टीची जोरदार चर्चा शहरात होती.

यावेळी आयोजक गीते म्हणाले की, गेली चार दशके मी राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे सुख, दुःखात साथ देणार्या सहकार्यांशी, मित्र परिवाराशी हितगुज व्हावे, विचारांची देवाण घेवाण व्हावी या उददेशाने या पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर सतिश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शिवेसेना नेते बबन घोलप, काँग्रेसच शहराध्यक्ष शरद आहेर, माजी महापौर अॅड. यतीन वाघ, विनायक पांडे, भाजप नेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रशांत जाधव, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, शिवाजी गांगुर्डे, सत्यभामा गाडेकर, सुजाता डेरे आदि उपस्थित होते.