Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशलसीकरणाचा चौथा टप्पा : ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

लसीकरणाचा चौथा टप्पा : ४५ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस

नवी दिल्ली :

येत्या एक एप्रिलपासून ४५ वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार आहे. लसीकरणाचा हा चौथा टप्पा असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासाठी परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीतअनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये अत्यंत वेगाने आणि चांगल्या पद्धतीने करोना प्रतिबंधक लसींचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत कोविड योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणारे रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. मात्र आता यात बदल करण्यात आले असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ एप्रिलपासून लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

४ कोटी नागरिकांचे लसीकरण

आतापर्यंत चार कोटी ८५ लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी चार कोटींपेक्षा असे व्यक्ती आहेत ज्यांना करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर ८५ लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असे जावडेकरांनी सांगितले. मागील २४ तासांत विक्रमी ३२ लाख ५४ हजार जणांना करोनाचे डोस देण्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये दिवसाला तीन लाख ७७ हजार करोनाचे डोस दिले जात होते. मार्च महिन्यात ही दैनंदिन आकडेवारी १५ लाख ५४ हजारांपर्यंत गेली आहे. भारताकडे मुबलक प्रमाणात लसी आहेत, अशी माहितीही केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. याशिवाय दोन्ही लस सुरक्षित असल्याचेही जावडेकर म्हणाले आहेत.

ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

देशातील 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेतच्या नुकत्याच झालेल्या व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी ही मागणी केली होती. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सर्वत्र लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी वयोगटाची अट शिथिल करणे गरजेचे आहे. विशेषतः 45 वर्षांवरील तरूण वर्ग कामासाठी बाहेर असतो, त्याला प्रतिबंधात्मक लस मिळणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्र्यांनी व्हिसीमध्ये सांगितले होते. ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होते. आतापर्यंत (दि. 22 मार्चच्या आकडेवारीनुसार) राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या