
नागपूर | Nagpur
येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. २०२४ मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर उत्तर देतांना पवारांनी बावनकुळेंना खोचक टोला लगावला आहे...
यावेळी ते म्हणाले की, बावनकुळेंनी आमचा करेक्ट कार्यक्रम करू असे सांगितल्यापासून मला झोप येत नाही. एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये होणा-या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे वाटते. असे पवार म्हणाल्याने त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनात बोलतांना सत्ताधारी भाजप (BJP) आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, काही महिन्यांआधी बावनकुळे यांनी बारामतीतील (Baramati) राष्ट्रवादीचे (NCP) घड्याळ बंद करण्याचा इशारा दिला होता. पण मनात आणले तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम करणार, असे म्हणत बावनकुळेंना इशारा दिला होता.
काय म्हणाले होते बावनकुळे
बारामती येथील माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाषा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत अजित दादांचा करेक्ट कार्यक्रम होईल असे बावनकुळेंनी सांगितले होते.