
मुंबई | Mumbai
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह भाजप (BJP) नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
त्यातच महाविकासआघाडीने (Maha Vikas Aghadi) देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून १७ डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आज मविआच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मोर्चाच्या पुढील नियोजनाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी अजित पवारांना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Government) महामोर्चाला परवानगी नाकारल्याचा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर बोलतांना ते म्हणाले की, हा मोर्चा अतिशय शांततेच्या मार्गाने होईल. लोकशाहीमध्ये (Democracy) ज्या पद्धतीने आपले मतप्रदर्शन करण्यासाठी मोर्चा काढला जातो तसाच आम्ही मोर्चा काढणार आहोत. यासाठी आम्ही राज्य सरकारकडे ज्या सर्व परवानग्या मागायच्या असतात त्या मागितल्या आहेत. अद्याप परवानगी आमच्या हातात आलेली नाही, परंतु आम्हाला परवानगी नक्की मिळेल असा विश्वास आम्हाला आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मुंबईत निघणाऱ्या मोर्चात महाराष्ट्रातून ज्यांना यायचंय ते उत्सफूर्तपणे या मोर्चात सहभागी होतील. महापुरुषांचा अपमान, सीमावाद, महागाई, बेरोजगारी, हे मोर्चाचे मुद्दे असल्याचे पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावर बोलतांना ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राची बाजू मांडण्याचे काम जेष्ठ वकील हरीष साळवे (Advocate Harish Salve)यांनी करावे, अशी आमची मागणी असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मी ही मागणी केल्याचे पवारांनी म्हटले आहे.