
मुंबई | Mumbai
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जिल्हाधिकारी, कृषी सहाय्यक अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी पैसे घेतल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे...
अजित पवार म्हणाले की, माझे अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी (Officer) चांगले संबंध आहेत. ते सांगतात की, आमचा उल्लेख करू नका, पण आम्हाला अधिकार असले, तरी मंत्रालयातून (Ministry) आलेल्या यादीतील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावेत, असे तोंडी आदेश आहेत. त्यातील काही तर अगदी परदेशातही गेले आहेत. बदल्या होणे, यांनी परदेशात जाणे आणि बातम्या येणे हा काही योगायोग आहे का हा संशोधनाचा मुद्दा आहे, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, 'कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट ३ लाख रुपये आहे, असे प्रसारमाध्यमांमध्ये छापून आले आहे. लाखो-कोट्यावधी रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसे करू शकतील? शासन आपल्या दारी नेले काय किंवा शासन आणखी कुठे नेले तरी शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय उपयोग नाही. शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक आहे. अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय ही फसवणूक थांबणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले.
तर शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाणे (MP Kripal Tumane) यांनी अजित पवार अर्थमंत्री असताना ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नव्हते असा गंभीर आरोप केला होता. त्यावर सुद्धा अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी पैसे घेतले म्हणून कृपाल तुमाणे यांच्याप्रमाणेच राज्यातील आणखी एका व्यक्तीने सांगावे मी पैसे घेतले तर मी राजकारण सोडेन आणि आरोप खोटा निघाला तर खासदार तुमाणे यांनी घरी बसावे, असे प्रतिआव्हानच अजित पवारांनी दिले.
तसेच सध्या शिंदे-फडणवीस सरकारची जाहिरातबाजी सुरू असून या माध्यमातून शेकडो कोटी रुपये खर्च करुन खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. याशिवाय राज्य सरकारने जो निर्णय घेतलाच नाही, अशा जाहिराती (Advertisements) दाखवून श्रेय घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र बसून काय जाहिरात करावी याचा विचार करावा, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला.