सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवरून जुंपली - सुप्रिया सुळेंच्या मागणीला तटकरेंचे प्रत्युत्तर

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीवरून जुंपली - सुप्रिया सुळेंच्या मागणीला तटकरेंचे प्रत्युत्तर

मुंबई | प्रतिनिधी

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आलेले नैराश्य अद्याप दूर झालेले दिसत नाही. सिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असून न्यायालयाचे निर्णयही झाले आहेत. त्यामुळे वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी वक्तव्ये येत असतात, असे प्रत्युत्तर अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे.

राज्यातील सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आणि राज्याच्या सत्तेत सामील झाला.

दरम्यान, संबंधित आरोपाची पंतप्रधानांनी चौकशी करून जनतेसमोर सत्य आणण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला अनेकदा दिले होते. या पार्श्वभूमीवर संसदेच्या विशेष अधिवेशनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख 'नॅचरल करप्ट पार्टी' असा केला आहे. पक्षावर त्यांनी दोन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यामुळे मोदींनी सिंचन आणि राज्य बँक घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी करावी, असे मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती.

यावर, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आलेले नैराश्य अद्याप दूर झालेले दिसत नाही. घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली असून न्यायालयाचे निर्णयही झाले आहेत. त्यामुळे वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशी वक्तव्ये येत असतात, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com