
मुंबई | Mumbai
महायुती सरकारचा (Mahayuti Government) गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमधील इच्छुकांनी आतापासूनच मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या गटातील आमदारांना (MLA) अधिक प्रमाणावर संधी मिळणार असल्याचे समजते आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या गटाला (Ajit Pawar's Group) एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. तसेच केंद्रात देखील अजित पवार गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट मंत्रिपद (Cabinet Ministership) येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून मंत्रीपदाची प्रतीक्षा करत आहेत. कारण अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली, अशी स्थिती शिंदेंच्या शिवसेनेची (Shinde's ShivSena) झाली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाला केंद्रात आणि राज्यात मंत्रिपदे मिळणार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. तसेच सरकारमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट सहभागी झाल्यामुळे शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय शिंदे गटातील अस्वस्थता देखील वाढत चालली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटातील आमदारांना संधी दिली जाणार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या (MLA) मंत्रीपदाच्या प्रतीक्षेवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.