
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल (दि.२१) संध्याकाळी एक ट्वीट करत राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर याचे पडसाद आज विधानसभेत देखील उमटले असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मंत्री दादा भुसे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले...
मंत्री दादा भुसे यांनी संजय राऊतांचे ट्वीट सभागृहात वाचून दाखवत म्हटले की, "आम्हाला गद्दार म्हणाले. मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी नाहीतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही."असे म्हणाले.
यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण शरद पवार यांचा उल्लेख केला, तो करायला नको होता, असे म्हणत दादा भुसे यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तर त्यावर स्पष्टीकरण देतांना भुसे म्हणाले की, मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी चुकीचे बोललेलो नाही. माझ्या विधानाचा पुनरुच्चार केला. मी जर चुकीचे बोललो असेल, तर माझं वक्तव्य तपासून घ्या आणि योग्य ती कारवाई करा असे त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले की, "दादा भुसे जे बोलले आहेत ते मी तपासून पाहिलं आणि रेकॉर्डवरून काढून टाकले जाईल." असे म्हटले.
संजय राऊतांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटले?
संजय राऊतांनी दादा भुसेंवर गिरणा अॅग्रोच्या नावाने लूट केल्याचा आरोप करत ट्वीटमध्ये म्हटले की, "हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले गेले. पण कंपनीच्या वेबसाईटवर मात्र फक्त १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स आहेत. तेही फक्त ४८ सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल", असं राऊत ट्वीटमध्ये म्हणाले.