
दिल्ली | Delhi
एअर इंडियाच्या विमानात (Air India Flight) महिला सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शंकर मिश्रा असून त्याला बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी मुंबईत येत राज्यभर छापेमारी केली होती. परंतू शंकर त्यांना सापडला नव्हता. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे बंगळुरूमध्ये छापा टाकण्यात आला व आरोपीला करण्यात आली.
दरम्यान शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं. कंपनीच्या वतीनं एक निवेदन जारी करताना म्हटलं होतं की, कंपनी आपल्या कर्मचार्यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करू, असंही कंपनीनं म्हटलं आहे.
शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी शुक्रवारी महिलेचे काही मेसेज शेअर करत दावा केला होता की पीडितेने कथित कृत्य माफ केलं होतं आणि तक्रार नोंदवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. मिश्रा यांच्या वकिलाने दावा केला की मिश्राने पीडितेला नुकसानभरपाई म्हणून 15,000 रुपये दिले होते, जे नंतर पीडितेच्या कुटुंबाने परत केले. त्याचवेळी, शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी शुक्रवारी दावा केला की त्यांच्या मुलावरील आरोप 'पूर्णपणे खोटे' आहेत.
प्रकरण नेमकं काय?
पीडित महिलेने सांगितले की, ही घटना 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या AI-102 या विमानात घडली होती. स्थानिक वेळेनुसार, एअर इंडियाची फ्लाईटने दुपारी जवळपास एक वाजण्याच्या सुमारास न्यूयॉर्कहून उड्डाण केले. दुपारी लंच झाल्यावर तात्काळ लाईट्स बंद करण्यात आले. त्यावेळी दारूच्या नशेत असलेला एक पुरुष प्रवासी माझ्या सीटजवळ आला. त्यानंतर त्याने आपल्या पँटची चैन उघडली आणि मला गुप्तांग दाखवू लागला. दारूच्या नशेत असलेल्या या पुरुष प्रवाशाने लघवी केली आणि त्यानंतरही तो तेथेच उभा होता. त्यानंतर एका दुसऱ्या प्रवाशाने त्याला जाण्यास सांगितले तेव्हा हा व्यक्ती तेथून निघून गेला. दारूच्या नशेत असलेला हा व्यक्ती तेथून निघून गेल्यावर पीडित महिलेने या घटनेची माहिती तात्काळ केबिन क्रू मेंबर्सला दिली.
तसेच, दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने केलेल्या लघवीमुळे माझे कपडे, शूज आणि बॅग पूर्ण खराब झाले होते. विमानातील क्रू मेंबर्सने या सर्व वस्तूंवर जंतुनाशकाची फवारणी केली. तर महिला प्रवाशाने एअरलाईन्सच्या टॉयलेटमध्ये स्वत:चे कपडे साफ केले त्यानंतर क्रू मेंबर्सने पीडित महिलेला काही कपडे आणि डिस्पोजेबल चप्पलचा एक सेट दिला. पीडित महिलेला त्या गलिच्छ जागेवर पुन्हा परतायचं नव्हतं आणि त्यामुळे ती टॉयलेटच्या शेजारीच उभी होती. जवळपास 20 मिनिटे ही महिला टॉयलेटच्या शेजारी उभी होती पण आपल्या जागेवर परतली नाही. त्यानंतर क्रू मेंबर्सने या महिलेला त्यांची एक सीट उपलब्ध करुन दिली. तर विमानातील स्टाफने गलिच्छ झालेल्या जागेवर साफसफाई करुन तेथे एक बेडशीट टाकली. मात्र, तरीही त्या जागेवर लघवीचा उग्र वास येत होता.