पीक विम्याची अग्रीम दिवाळीपूर्वी जमा करा - कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
पीक विम्याची अग्रीम दिवाळीपूर्वी जमा करा - कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) सन २०२२-२३ या वर्षातील केळी आणि इतर खरीप पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विद्यापीठाकडून पीक परिस्थितीचा गुगल मॅपिंगचा डाटा घेऊन पुन्हा पडताळणी करावी. तसेच जिल्ह्यात ज्या मंडळांमध्ये २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड पडला आहे अशा मंडळांमध्ये अग्रीम पीक विम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिले आहेत....

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत जळगाव जिल्ह्यात सन २०२२-२३ या वर्षातील केळी आणि इतर खरीप पिकांच्या पीक विम्याबाबत (Crop Insurance) गुरुवार (दि.२१) रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली हाती. या बैठकीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, कृषी आयुक्त सुनील चव्हाण उपस्थित होते

पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षांमध्ये ७७ हजार ८६० शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते. त्यामधून ८१ हजार ५१० हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले. त्यापैकी केवळ ४६ हजार ९४९ अर्जांची तपासणी करण्यात आली होती. तसेच या कालावधीतील पीक परिस्थितीचा अहवाल महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मागवून घेऊन फेर पडताळणी करून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्याचे निर्देश मुंडे यांनी बैठकीत दिले.

दरम्यान, यावेळी गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक खंड दिला असल्याने पीक विम्याची २५ टक्के रक्कम अग्रीम देण्याची मागणी केली. यावर धनंजय मुंडे यांनी याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा होईल, असे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com