
दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन पावसाचे (Rain) वातावरण तयार झाले होते. त्यांनतर दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) काही भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे...
तालुक्यातील जालखेड, गोळशी, कोकणगाव, ओझे, म्हेळूस्के, निळवंडी, कृष्णगाव, ढकांबे, मडकीजांब आदी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, कांदे व इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले आहे. द्राक्षबागेमध्ये पाणी साचले आहे. काही शेतकर्यांनी कांदा, गहू, हरभरा काढून शेतामध्ये ठेवल्याने ते पूर्णपणे भिजले असल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
तसेच जालखेड परिसरात मोठ्या प्रमाणावर वादळी वार्यासह गारपीट झाल्याने कारले, टोमॅटो, वांगे, दोडकी, मिरची आदी शेती पिकांचे (Crop) अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुर्णत: हतबल झाला आहे. दरवर्षी काही ना काही संकटांना शेतकर्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिकांसाठी खते, बि- बियाणे, मजूरी, औषधे आदींमध्ये भाववाढ झाली आहे. त्यामुळे केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
सोंगणीसाठी आलेल्या गहू, हरभरा गारपिटीने पूर्णपणे आडवे पडल्याने या पिकांची सोंगणी कशी करावी असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. त्याचबरोबर भाजीपाला पिकांची या अवकाळी पावसाने पूर्णपणे वाट लावली आहे. तसेच तालुक्यातील द्राक्षे जवळजवळ ५० टक्के खुडणे बाकी असल्याने बागेमध्ये पाणी साचल्याने द्राक्ष खुडणी करावी कशी ? असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यासमोर उध्वस्त होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्वरीत पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी.
जीवन मोरे, उपसरपंच जालखेड