वैद्यकीय महाविद्यालयातील काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय

मागण्यांची पूर्तता करण्याचे अमित देशमुख यांचे आश्वासन
वैद्यकीय महाविद्यालयातील काम बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी यांना कंत्राटी तत्वावर वेतन न देता त्यांना नियमित वेतन श्रेणीनुसार वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी दिले.

त्याचप्रमाणे ज्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात यावा, असेही देशमुख यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या या आश्वासनंतर वैद्यकीय शिक्षक संघटना आणि वैद्यकीय अधिकारी संघटनेने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

राज्‍य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्‍णालयातील वैद्यकीय अधिका-यांनी आपल्‍या प्रलंबित मागण्यांसाठी आज काम बंद आंदोलन केले.या आंदोलनाची दखल न घेतल्यास २२ एप्रिपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा वैद्यकीय महाविद्यालय अधिकारी संघटनेने दिला होता.

या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली.

वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांपैकी ज्या प्राध्यापकांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या नाहीत मात्र ते राज्यातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत अशा सहाय्यक प्राध्यापकांच्या सेवाही नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव देण्यात यावा.

त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर देय असणारे भत्तेही तातडीने देण्यात यावेत. ज्या प्राध्यापकांच्या सेवा गेल्या अनेक वर्षापासून तदर्थ स्वरूपात आहेत त्यांच्या सेवाही नियमित करण्याचे आदेश काढण्यात यावेत, असे निर्देश अमित देशमुख यांनी बैठकीत दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com