रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरात प्रवेशासाठी मुख्य मार्ग असलेल्या जुना आग्रारोडच्या नुतनीकरणाचे गत अनेक महिन्यांपासून रखडलेले काम तसेच फुटलेल्या गटारींचे सांडपाणी रस्त्यावर येवून निर्माण झालेली दुर्गंधी व खड्ड्यांमुळे दररोज अपघाताच्या घटना घडून नागरीक जायबंदी होत असतांना देखील मनपा प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त झालेल्या एमआयएम आ. मौलाना मुफ्ती मो. इस्माईल (MLA Maulana Mufti Md. Ismail)यांच्यासह कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर ठान मांडून आंदोलन छेडले. तब्बल चार तास सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जुना आग्रारोडवरील वाहतूक पुर्णत: ठप्प झाली होती.

आंदोलन काळात रस्त्यावरच मौलानांसह कार्यकर्त्यांनी दुपारचे नमाज पठण केले. आंदोलनस्थळी दाखल झालेल्या आयुक्तांवर कार्यकर्त्याने चहा फेकून आपला संताप व्यक्त केला. जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही असा पवित्रा आ. मुफ्ती यांनी घेत मनपा प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टिकास्त्र सोडले.

दोन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कामास मनपातर्फे प्रारंभ करण्यात आल्यानंतर तब्बल चार तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे सुरू झालेले काम थांबविल्यास आपण पुन्हा रस्त्यावर बसून आंदोलन छेडू, असा इशारा आ. मौलाना मुफ्ती यांनी यावेळी दिला.

शहरातील जुना आग्रारोडची संथगतीने सुरू असलेल्या उड्डाण पुल तसेच दरेगाव नाका ते महामार्गापर्यंत रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून फुटलेल्या गटारींचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहरात प्रवेश करणारा हा प्रमुख मार्ग असतांना देखील त्याचे काम होत नसल्याने नागरीकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज अपघातांच्या घटना घडून नागरीक जायबंदी होत आहेत. या रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी करण्यात येवून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरीकांमध्ये असंतोष पसरला होता.

आज दुपारी आ. मौलाना मुफ्ती यांच्यासह एमआयएम पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरीकांनी जुना आग्रारोडवर ठिय्या मांडत आंदोलनास प्रारंभ केला. दुपारची नमाज देखील आ. मुफ्तींसह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच अदा केली. आयुक्त भालचंद्र गोसावी आंदोलकांची भेट घेण्यासाठी आले असता कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर चहा फेकत आपला रोष प्रगट व्यक्त केला. यावेळी आ. मौलाना मुफ्ती यांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर टिकास्त्र सोडले. पुर्व भागातील समस्यांकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे.

जुना आग्रारोडच्या कामाकडे लक्ष वेधल्यावर अधिकारी, ठेकेदार असेच काम चालेल अशी मुजोरी करतात. सर्वाधिक कर भरून देखील पुर्व भागातील जनतेस विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जुना आग्रारोडचे काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आपण रस्त्यावरून उठणार नाही, असे आ. मुफ्ती यांनी स्पष्ट केले. आयुक्त गोसावी यांनी काम लगेच सुरू होईल. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता मौलाना मुफ्ती यांनी ती धुडकावून लावली. काम सुरू करा तरच उठेल असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तात्काळ दोन जेसीबी पाचारण करण्यात येवून प्रशासनातर्फे कामास प्रारंभ केला गेल्याने आ. मौलाना मुफ्ती यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी अनुुचित प्रकार घडू नये यास्तव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com