Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्याकंगना वादावर पवारांच्या हस्तक्षेपानंतर शिवसेनेचे मौन!

कंगना वादावर पवारांच्या हस्तक्षेपानंतर शिवसेनेचे मौन!

मुंबई :

कंगना राणावत या अभिनेत्रीच्या मुद्यावरून शिवसेन आक्रमक झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.

- Advertisement -

कंगना रानौत प्रकरणामुळे चिघळलेल्या स्थितीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. या मुद्याला इतके महत्व देण्याची गरज नसल्याने त्यावर संयम ठेवायला हवा असे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

कंगनाच्या मुंबई, महाराष्ट्र विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली असून कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांकडून विमानतळावर आंदोलन करण्यात आले. कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. सूचना देऊनही आंदोलन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांचा बोलण्यास नकार

दुसरीकडे कंगनाच्या विषयावर बोलू नका, असा सक्त आदेश मातोश्रीवरुन पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर कंगना राणौत वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, असेच उत्तर दिले. ‘आज मी दिवसभर ऑफिसमध्ये होतो. मी काहीही पाहिले नाही, मला आज काहीच माहिती नाही,’ असे राऊत म्हणाले.

दरम्यान, कंगनाविरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना, मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली आहे. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. याबाबत बोलताना शरद पवार यांनी कंगनाच्या कार्यालयातील बांधकाम कारवाईबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगितले. पण सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला आपण संधी देतो, असेही पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या