पुणे, औरंगाबादनंतर नाशकात सर्वाधिक लाचखोर

भ्रष्टाचाराची कीड : 97 सापळ्यांत 135 आरोपी पकडले
पुणे, औरंगाबादनंतर नाशकात सर्वाधिक लाचखोर

नाशिक । वैभव कातकाडे Nashik

गेल्या दोन महिन्यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांच्यापाठोपाठ पोलीस उपनिरीक्षकास लाच Bribe घेताना अटक झाली. यामुळे राज्यात पुणे, औरंगाबादनंतर नाशिक Nashik परिक्षेत्राचा क्रमांक लागलेला दिसून येत आहे. नाशिक परिक्षेत्रात 97 सापळ्यांमध्ये 135 आरोपी पकडण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या अखत्यारित असलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग शासकीय सेवक, अधिकारी यांच्यावर कटाक्षाने नजर ठेवत आहे. यामध्ये 1068 या क्रमांकावर आलेल्या तक्रारी असो किंवा कोणी फोनवर दिलेली माहिती असो तातडीने उपाययोजना करण्यात तत्पर असतात. तसेच केलेल्या कार्याची दैनंदिन माहिती लाचलुचपत विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत केली जात आहे.

राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑक्टोबरपर्यंत एकूण 600 गुन्ह्यांत 854 आरोपींना पकडण्यात आले असून यामध्ये सर्वाधिक सापळे आणि सर्वाधिक भ्रष्ट आरोपीदेखील पुणे परिक्षेत्रातच असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पुणे परिक्षेत्रात 132 सापळ्यामध्ये 191 आरोपी पकडण्यात आले आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या औरंगाबाद परिक्षेत्रात 110 सापळ्यामध्ये 153 आरोपी पकडण्यात आले आहेत. सर्वात कमी 41 सापळे मुंबई परिक्षेत्रात झाले असून यात 57 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कडक लॉकडाउन असतानाही भ्रष्टाचार आणि त्याअनुषंगाने सापळे कमी झाले नव्हते. त्यातच आता लॉकडाउनचे नियम शिथिल झाले असून, अनेक कार्यालयीन कामकाज सुरू झाले आहेत. त्यामुळे अँण्टी करप्शन ब्युरोच्या सापळ्यांनीही गती पकडली आहे. लाचखोरीमध्ये नेहमीप्रमाणे महसूल, पोलिस हे अग्रेसरच आहेत.

657 लाचखोर अटकेत

राज्यात 1 जानेवारी ते 10 ऑगस्ट या कालावधीत सापळ्यांची संख्या 475 इतकी झाली. यात 657 आरोपी लाच घेताना अटक झाले, तर 10 ऑगस्ट ते 10 ऑक्टोबर याकाळात 125 सापळ्यांची वाढ झाली आहे. तर 197 लाचखोर आरोपींची वाढ झाली आहे.

एकपेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग

लाच घेण्याच्या गैरप्रकारामध्ये पूर्वी संबंधित एका व्यक्तीचा समावेश होता. मात्र अलीकडील लाचखोरीची प्रकरणे बघता एकपेक्षा अधिक व्यक्ती यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेदेखील कार्यप्रणाली बदलून एकाच वेळी संबंधित अधिकारी, सेवकांना सापळा रचून अटक केल्याचे समोर येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com