
मुंबई | Mumbai
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि पक्षाचं चिन्हं शिंदे गटाला दिलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाची चर्चा सुरू असतानाच आता ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) आपल्या बाजूने ६ खासदार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात ४ खासदारांचीच शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शपथपत्र न देणारे ते दोन खासदार कोण? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या आकडेवारीच्या आधारे धनुष्यबाणासंदर्भात निर्णय सुनावला, त्या आकडेवारीत असे नमूद करण्यात आले आहे की, लोकसभेतील एकूण १९ खासदारांपैकी १३ खासदार शिंदे गटाच्या बाजूने होते. त्यांची शपथपत्र शिंदे गटाकडून (Shinde Group) निवडणूक आयोगात सादर करण्यात आली आहेत.
तर ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) बाजूने लोकसभेचे सहा खासदार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र लोकसभेतील केवळ चारच खासदारांची शपथपत्र निवडणूक आयोगासमोर सादर झाली आहेत. राज्यसभेत शिवसेनेचे तीन खासदार असून त्या तीनही खासदारांची शपथपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आली आहेत.
तसेच निवडणूक आयोगाकडे शपथपत्र न देणाऱ्या दोन खासदारांपैकी परभणीतील ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) बाजूने निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र, स्वत: खासदार संजय जाधव यांनी हा आरोप फेटाळून लावला असून शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याचा पुरावा दिल्यास खासदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान जाधव यांनी दिले आहे. तर निवडणूक आयोगाकडे शपथपत्र न देणारे दुसरे खासदार कोण, हे नाव लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.