सामायिक, मिश्र शिक्षण पद्धती अवलंबा- विद्यापीठ अनुदान आयोगाची शिफारस

सामायिक, मिश्र शिक्षण पद्धती अवलंबा- विद्यापीठ अनुदान आयोगाची शिफारस
USER

नाशिक । प्रतिनिधी

विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्चशिक्षण संस्थांना सामायिक किंवा मिश्र शिक्षण पद्धती (ऑनलाइन आणि ऑफलाइन) अवलंबण्याची शिफारस केली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर यूजीसीने तज्ज्ञ समितीद्वारे सामायिक शिक्षण अध्यापन पद्धतीच्या मार्गदर्शक सूचनांचा आराखडा तयार केला आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा उपलब्ध करून दिला आहे. मुक्तस्रोत साहित्य असलेली देशविदेशातील संकेतस्थळे, ऑनलाइन शिक्षणासाठीची संकेतस्थळे, प्रॉक्टर्ड पद्धतीच्या परीक्षांसाठीची संकेतस्थळे, आवश्यक सॉफ्टवेअर, किमान आणि अपेक्षित साधनसुविधा आदी माहिती मसुद्यात देण्यात आली आहे.

केवळ ऑनलाइन शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण यांचे मिश्रण नाही, तर या दोन्ही पद्धतींचा नियोजनपूर्वक मिलाफ, अर्थपूर्ण कृती असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. सामायिक शिक्षण पद्धतीसाठी ईप्सित हे प्रारूप प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रारुपामध्ये शिक्षणासाठीचे स्रोत शोधून विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, विद्यार्थ्यांना स्रोत उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना आवश्यक मदत करणे, अध्ययन अध्यापनातील त्रुटी ओळखून त्या दूर करणे आणि चाचणी घेणे यांचा समावेश आहे.

21 व्या शतकातील आवश्यक कौशल्ये शिकण्यासाठी मिश्र शिक्षण पद्धती महत्त्वाची असून, त्याची काळजीपूर्वक अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांतील अध्ययन-अध्यापनामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याची शिफारस नव्या शिक्षण धोरणात आहे. अध्ययन अध्यापनातील मिश्र पद्धतीमुळे मूल्यमापनासाठी वेगळा विचार करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाला विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी प्रोत्साहन द्यावे. ओपन बुक एक्झाम, समूह परीक्षा, तोंडी परीक्षा, मागणीनुसार परीक्षा, ऑनलाइन प्रश्नमंजूषा अशा पद्धती वापरता येऊ शकतात.

6 जूनपर्यंत सूचना करा

सामायिक शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यासक्रमातील 60 टक्के भाग प्रत्यक्ष पद्धतीने, 40 टक्के भाग ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याबाबत यूजीसीकडून सुचवण्यात आले असून, मसुद्यावर 6 जूनपर्यंत हरकती-सूचना मागवण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com