वाघदर्डीत मुबलक जलसाठा; मात्र मनमाडला पंधरा दिवसाआड पाणी

jalgaon-digital
3 Min Read

मनमाड | बब्बू शेख

मनमाड नगरपरिषदेच्या ढिसाळ व अनियंत्रित कारभारामुळे मनमाड शहरातील (Manmad) सव्वा लाख नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला (Water scarcity) सामोरे जावे लागत आहे…

शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणार्‍या वागदर्डी धरणात (Vagdardi Dam) पाण्याचा मुबलक साठा असतानादेखील धरण उशाला अन् कोरड घशाला अशी गत झाली आहे.

उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाई निर्माण होते, मात्र यंदा पावसाळ्यातदेखील महिन्यातून दोन वेळाच पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

शहरात नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिकांना एक हंडा पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे.

मात्र छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरणारे लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि सामजिक संघटना पाणीटंचाईबाबत मात्र मौन बाळगत पालिका प्रशासनाला कोणीही जाब विचारत नसल्याने शहराला खरंच कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

रेल्वेचे मोठे जंक्शन, धान्य साठवणूक करणारे अन्न महामंडळाचे आशिया खंडात क्रमांक दोनचे मानले जाणारे डेपो, रेल्वे ब्रीज बनवण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्टसह इतर साहित्य तयार करणारा ब्रिटीशकालीन कारखाना, विविध ऑईल कंपन्यांचे इंधन प्रकल्प आदींमुळे देशाच्या नकाशावर मनमाड शहराची (Manmad) आगळीवेगळी ओळख आहे.

परंतु पाणीटंचाईचे माहेरघर म्हणूनदेखील या शहराची नवीन ओळख निर्माण झाली आहे. पावसाअभावी दरवर्षी उन्हाळ्यात कोरडे पडणारे वागदर्डी, भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खाली जात तळ गाठणार्‍या विहिरी, बंद पडणारे हातपंप व बोरअवेल त्यामुळे एक हंडा पाण्यासाठी होणारी अबालवृद्धांची धडपड असे विदारक चित्र गेल्या 30 ते 35 वर्षांपासून येथे पाहावयास मिळत आहे.

पाणीटंचाईला कंटाळून सुमारे दहा हजारपेक्षा जास्त नागरिकांनी शहराला राम राम ठोकला आहे. तर येथे मंजूर झालेली औद्योगिक वसाहत केवळ पाण्याअभावी सुरू झाली नाही. उच्च शिक्षण घेऊनदेखील काम मिळत नसल्याचे पाहून हजारो सुशिक्षित तरुण तुटपुंज्या पगारावर इतर शहरात काम करत आहेत.

मात्र गेल्यावर्षी परतीच्या पावसाने शहर परिसरात जोरदार हजेरी लावल्याने प्रथमच शहरातून वाहणार्‍या रामगुळना व पांझण या दोन्ही नद्यांना महापूर आला होता. पाणलोट क्षेत्रातदेखील अतिवृष्टी झाल्याने वागदर्डी धरण केवळ पूर्ण भरलेच नाही तर ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते.

यावर्षीदेखील सुरुवातीला शहर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मनमाडचा पाणीपुरवठा हा पालखेड धरणातून मिळणार्‍या पाण्याच्या आवर्तनावर जास्त अवलंबून असून त्यातून सर्व रोटेशनचे पाणी घेण्यात आले आहे. सध्या धरणात पाण्याचा मुबलक साठा असतानादेखील आजही नागरिकांना महिन्यातून दोन वेळेच पाणी मिळत आहे.

धरणात पाणी असले तरी आणि नसले तरी पाणीटंचाई कायम असल्याचे पाहून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. विशेषत: धरणात पाणी असूनदेखील पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नगरसेवक, राजकीय पक्ष, संघटना गप्प आहेत. पालिका प्रशासनाला याचा कोणीही जाब विचारत नसल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *