
मुंबई | Mumbai
अभिनेता गोविंदाची (Govinda) ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे. तब्बल १ हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळा प्रकरणात (Ponzi scam case) ही चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.
क्रिप्टोच्या (Crypto) नावाखाली सोलर टेक्नो अलायन्सची पॉन्झी योजना होती. कंपनीने तब्ब्ल २ लाख लोकांकडून १ हजार कोटी पैसे जमा केल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदाने प्रमोशनल व्हिडीओत या कंपनीचे समर्थन केल्याचा धक्कादायक आरोप लावण्यात आला आहे.
सोलर टेक्नो अलायन्स (STA- Token) हे अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहे. तसेच क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपणे ऑनलाइन पॉन्झी योजना चालवत असल्याची धक्कादायक माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या ऑनलाइन पॉन्झी योजनेत रिझर्व्ह बँक इंडियाकडून कोणत्याही अधिकृततेशिवाय देशामधील २ लाखापेक्षा जास्त लोकांकडून १ हजार कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचे देखील आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे.
या कंपनीच्या विविध प्रमोशनल व्हिडीओत गोविंदाने त्यांची प्रसिद्धी केली होती. म्हणूनच या प्रकरणाची अधिक माहिती मिळवण्यासाठी गोविंदाची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही गोविंदाच्या चौकशीसाठी लवकरच मुंबईला एक टीम पाठवणार आहोत.
गोविंदाने जुलै महिन्यामध्ये गोव्यात पार पडलेल्या या कंपनीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कंपनीच्या काही व्हिडीओत त्यांनी कंपनीची प्रसिद्धी केली होती, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे इन्स्पेक्टर जनरल जे. एन. पंकज यांनी यावेळी दिली आहे.