
सातपूर । प्रतिनिधी Satpur
जुन्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नियोजित केल्या जाणार्या विविध कार्यक्रमांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, पोलिसांच्या हॉटेल, रिसॉर्टसह खासगी फार्म हाऊसवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे.
सातपूर पोलिसांनी याबाबत विशेष नियोजन केले असून, बेकायदेशीर कामांच्या विरोधात कंबर कसली आहे. या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
नववर्षांच्या स्वागताला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून अधिकारी, 40 अंमलदारांसह 30 होमगार्ड रस्त्यावर उतरणार आहे. वेगाने वाहने चालवणारे रायडर पोलिसांच्या विशेष टारगेटवर राहणार आहेत. बार परमिट रूम सुरू राहणार असल्याने मद्यपी आणि अती उत्साही होऊन वाहन चालविणे, भांडण करणे यासह नागरिकांशी वादावर पोलिसांचा स्पेशल वाँच राहणार आहे.
परिसरातील सर्व हॉटेल रिसोर्ट चालकांकडून पार्ट्यांंच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरु आहे. काही हॉटेल्स मालकांकडून तरुणाईचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी डीजे, नृत्यविष्कार, गझल गायनाच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या हॉटेल, रिसॉर्टसह खासगी फार्म हाऊसवर साध्या वेषातील पोलिसांची करडी नजर राहणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
मद्य पिऊन वाहन चालविणार्यांची संख्या मोठी असून अपघाताला निमंत्रण दिले जाऊ शकते, हे लक्षात घेऊन पोलीस ठिकठिकाणी कुटुंबासोबत साजरा करा थर्टी फर्स्ट या आशयाचे स्लोगन मोबाईलवरून देण्याचा धडाका सुरू करण्यात आला आहे. नाकाबंदी करत मद्यपी वाहनचालकांच तपासणी करणार आहे. दरम्यान 31 डिसेंबरच्या रात्री शहरात चौकाचौकांत व रस्त्यावर खाकीसह साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सांगितले.
वाढत्या व्यसनाधीनतेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून तरुणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. नवीन वर्षाचे स्वागत आपल्या कुटुंबासोबत साजरा करत आनंद द्विगुणित करा.
- महेंद्र चव्हाण, वपोनि, सातपूर
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण हद्दीत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे नाशिक ग्रामीण अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी सांगितले. यंदा 30 व 31 डिसेंबरला जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्वत्र नाकेबंदी केली जाणार असून सर्व वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. ज्या हॉटेल्समध्ये मद्य विक्रीचा परवाना आहे अशाच हॉटेल्समध्ये नागरिकांनी जावे. नागरिकांनी आनंदाने नववर्षाचे स्वागत करावे मात्र ते सर्व नियमातच राहून. पर्यटकांनी देखील विशेष दक्षता घ्यावी.
-शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक