Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशकात सामाजिक अंतर न पाळणे व विनामास्क फिरणे आता पडणार महागात

नाशकात सामाजिक अंतर न पाळणे व विनामास्क फिरणे आता पडणार महागात

नाशिक | Nashik

जिल्ह्यात ऑक्सिजन पुरेसा आहे; प्रत्येक रूग्णाला तो वेळेत मिळेल यासाठीचे नियोजन करण्यात यावे. तसेच ऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांची कुठल्याही ठिकाणी अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच वैद्यकीय उपचारासाठीच ऑक्सिजन वाहतुक व पुरवठ्यासाठीचे प्राधान्याने व्यवस्थापन करण्याच्या सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्ह्यातील कोरोना उपचारासंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते.

बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप घुगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, बेड उपलब्ध असूनही नागरीकांपर्यंत त्याची माहिती पोहचविण्याची प्रणाली गरजेप्रमाणे निर्माण करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा तसेच त्याचे वेळोवेळी मुल्यमापन केले नाही तर लोकांमध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण होते.

वैद्यकीय सुविधा व त्याची आवश्यकता यावरील किती व कशी ? यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही करण्याची गरज आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांमधून चर्चा होत आहे परंतु जिल्ह्यात सध्या प्रत्येक रूग्णासाठी ७ ते ८ लिटर पर मीटर इतका ऑक्सिजन गरजेचा आहे.

आज जिल्ह्यात जवळ जवळ एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ मे. टन ऑक्सिजन लागत असून आपल्याकडे तो ४३ मे.टन इतका उपलब्ध आहे. यातील ऑक्सिजनचा पुरवठा प्रामुख्याने वैद्यकीय प्रयोजनासाठी वापरण्यात यावा व वैद्यकीय कारणासाठी पुरेसा उपलब्ध आहे, याची खात्री झाल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाच्या व उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगासाठी त्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे.

दैनंदिन ऑक्सिजन वाहतुकीसाठी टॅंकर्सची आवश्यकता असून त्यासाठी तात्काळ आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी दररोज ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २ टॅंकर्स पुरवण्याची ग्वाही दिली आहे. कोरोना हा निरंतर चालणारा आजार असून त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर्सची निर्मिती करणे गरजेचे आहे.

ते करण्यासाठी तात्काळ ई-निविदेच्या माध्यमातून तात्काळ काम सुरू करावे, कुठल्याही पेशंटला ऑक्सिजनची कमतरता सद्यस्थितीत भासणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी तसेच ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटर्सची संख्याही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्धता वाढविण्यासाठी नियोजन करावे. कोरोनाग्रस्तांना दुप्पट ऑक्सिजन भासेल या अंदाजाने भविष्याचे नियोजन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केल्या आहेत.

लॉकडाऊनच्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्याच्या फलनिष्पत्तीचा विचार करूनच अनलॉक चा निर्णय घेण्यात आलाय परंतु लोकांनी अनलॉक म्हणजे कोरोना गेला आहे की काय अशा अविर्भावात बिनधास्त वावरणे सुरू केले आहे.

त्या अनुषंगाने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन सर्वांना करायला हवे त्यासाठी शहर पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांनी कठोर उपाययोजना कराव्यात. केवळ दंड करणे हा शासन प्रशासनाचा हेतू नसून जनमानसात नियमांच्या अंमलबजावणीची भावना निर्माण करणे हा यामागचा हेतू आहे.

ज्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल त्यास प्रथम समज देण्यात यावी, त्यानंतरही त्या दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल तर ते दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात यावी. योग्य अंतराचे भाव राखून भाजीपाल्याचे विक्रीची खुल्या जागांवर व्यवस्था करता येत असेल तर ती निश्चितपणे करण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी पोलीस प्रशासनाची भुमिका अत्यंत महत्वाची असून येणाऱ्या ४ दिवसात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

सध्या जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरू झाली असून ती केवळ शासकीय मोहिम नसून ती जनजागृतीबरोबरच सर्वेक्षणाची जनचळवळ आहे. त्यासाठी सर्व साधनांची उपलब्धता व समन्वयाची काळजी प्रत्येक विभागाने घ्यावी.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना व्हावा या दृष्टीने काही सूचना रुग्णालयांकडून प्राप्त झालेल्या आहेत त्या योग्य त्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासनास कळविले असून त्यावर तात्काळ तोंडगा काढण्यासाठी आरोग्यमंत्री डॉ. शिंगणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला असून त्यांनी त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचेही आश्वासन दिले आहे, अशीही माहिती यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिली.

येणाऱ्या काळात वाढत्या रुग्णसंख्येला पुरेल इतके बेड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर्स बेड, मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर उभारता येईल यासाठीच्या जागा हेरून त्यासाठी पूर्वनियोजन करावे.

टेली कौन्सिलींग तसेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने शहरी तसेच ग्रामीण भागातही प्रभावी उपचार केले जाऊ शकतात तसे प्रयोग आपण यशस्वी केले आहेत. येणाऱ्या काळात ते आणखी प्रभावीपणे राबविण्यात यावेत.

प्रत्येक रुग्णालयातून ते खाजगी असो वा सरकारी तेथे २ अधिकाऱ्यांची नियुक्ता करून जनतेला त्यांचा मोबाईल संपर्क नंबर उपलब्ध द्यावा जेणेकरून लोकांना त्यांच्या माध्यमातून योग्य माहिती पोहचेल असे पहावे व त्यांच्यावर सनियंत्रणासाठी स्वतंत्र टीम असावी असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या