Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभूमाफियांवर महाराष्ट्रात प्रथमच कारवाई; रम्मी राजपूतवर अखेर ‘माेक्का’

भूमाफियांवर महाराष्ट्रात प्रथमच कारवाई; रम्मी राजपूतवर अखेर ‘माेक्का’

नाशिक | प्रतिनिधी

वृद्धाची हत्या झाल्याचे भासवून आनंदवलीतील मोक्याचा व काेट्यवधी रुपयांचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य सूत्रधार रम्मी राजपूतसह अन्य संशयितांच्या टोळीला शहर पाेलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अखेर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. भूमाफियांवरील महाराष्ट्रामधील ही पहिलीच कारवाई असल्याचे पाेलीस आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संशयितांनी रमेश मंडलिक (७२) या वृद्ध जमीन मालकाची निर्घृण हत्या केली होती. पुरावे समोर नसताना पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करून या टोळीचे कृत्य समाेर आणले हाेते. आनंदवली येथील मंडलीक यांची हत्या वरवर जमीन वादातून झालेली भासवण्यात आले होते. हत्या करणारा संशयित हा सुद्धा भाडोत्री होता. त्यामुळे फारसे प्रत्यक्ष पुरावे नव्हते. प्रत्यक्षदर्शी सुद्धा नव्हते.

या परिस्थितीत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तळ ठोकला. पोलिस उपायुक्त अमोल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल आणि त्यांच्या पथकाने पुराव्यांची साखळी जोडून या गुन्ह्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या तब्बल १२ जणांना समोर आणले. यातील दहा जणांना अटक करण्यात यश आले तर, शहरातील भुमाफिकांची दहशत, मुजाेरी, संघटीत गुन्हेगारी असे मुद्दे पुढे आले. त्यामुळे या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्याचाा निर्णय पोलिस आयुक्त पांडे यांनी त्याचवेळी जाहीर केला होता. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्याने प्रस्ताव तयार केला.

टोळीत सहभागी असलेल्या संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. भुमाफियांना आवरण्यासाठी यापुढे थेट महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्याचा इशारा पांडे यांनी दिला आहे.

यांच्यावर माेक्कान्वये कारवाई

या गुन्ह्याचा रम्मी राजपूत हा मास्टरमाईंड असल्याचे पाेलीसांनी सांगितले आहे. यामध्ये सचिन मंडलीक (३६, रा. मंडलीकनगर, आनंदवली), अक्षय उर्फ अतुल मंडलिक (२६, रा. नवश्यागणपतीजवळ), भुषण मोटकरी (३२, रा. रसोई हॉटेलच्यामागे), सोमनाथ मंडलिक (५०, कॅनलरोड, आनंदवली), दत्तात्रय मंडलिक (४७, कपिला बिल्डींग, सिन्नरफाटा), नितीन खैरे (पद्मदर्शन प्लाझा, आनंदवली), आबासाहेब भंडागे (४१, रा. तुळजाभवानीनगर, पेठरोड), भगवान चांगले (२७, रा. पेठरोड), बाळासाहेब कोल्हे (५४, रा. राजबंगला कॉलनी, गंगापूररोड), गणेश काळे (२५, रा. तुळजाभवानीनगर, पेठरोड), वैभव वराडे (२१, रा. तुळजाभवानीनगर, पेठरोड) सागर शिवाजी ठाकरे (२५, रा. गुलमोहर कॉलनी, धृवनगर) यांना या गुन्ह्यात अटक असून, रम्मी राजपूत आणि जगदीश मंडलिक हे दोघे संशयित पसार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या