मोहदरी घाटात अपघात : मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच आईने फोडला हंबरडा

पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
मोहदरी घाटात अपघात :  मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच आईने फोडला हंबरडा

सिन्नर। वार्ताहर Sinnar

नाशिक-सिन्नर महामार्गावर ( Nashik- Sinnar Highway) मोहदरी घाटात (Mohdari Ghat ) सायंकाळी 5 च्या सुमारास तीन वाहनांच्या विचित्र अपघातात नाशिकमधील केटीएचएम व ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

नाशिकमधील वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे 8 विद्यार्थी स्विफ्ट कार क्र. एम. एच. 03/ ए. आर. 1615 ने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकाला धडकून 3 ते 4 पलटी घेत सिन्नरकडे येणाऱ्या लेनवरील स्विफ्ट क्र. एम. एच. 12/ एस. एफ. 4542 यांच्यावर येऊन आदळली. यावेळी सिन्नरकडे पाठमागून येणारी इनोवा कार क्र. एम. एच. 18/ ए. एन. 1443 ही देखील स्विफ्ट कारवर येऊन आदळली.

यामुळे विद्यार्थ्यांच्या कारमधील हर्ष दीपक बोडके (17) रा. कामटवाडा नाशिक, सायली अशोक पाटील (17) रा. राणेनगर, नाशिक, प्रतिक्षा दगु घुले रा. पाथर्डी फाटा, नाशिक, शुभम तायडे रा. शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक ( चौघे केटीएचएम महाविद्यालय) व मयुरी अनिल पाटील, त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक (मातोश्री इंजिनिअरिंग महाविद्यालय, ओढा) या 5 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्यार्थ्यांमधील साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड व ईनोवा कारमधील सुनील ज्ञानेश्वर दळवी हेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर महामार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत जखमींना बाहेर काढले. सिन्नर येथील 4 रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

साक्षी व साहिल यांचेवर सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर गायत्री व दळवी यांना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत अपघाताचा पंचनामा केला. अपघातामुळे महामार्गावर एक ते दोन तास वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. महामार्ग पोलिसांनी ही तात्काळ घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली. मृतदेहांवर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून करण्यात आले.

आईने फोडला हंबरडा

कार मधील सर्व विद्यार्थी मित्राच्या लग्नासाठी गेले असल्याचे समजत आहे मात्र याबाबत त्यांच्या आई-वडिलांना कुठलीही कल्पना नसल्याचे रुग्णालयात आल्यानंतर स्पष्ट झाले अपघाताची माहिती कळताच हर्ष चे आई वडील रुग्णालयात आले असता त्याच्या मृत्यूची माहिती समजतात त्याच्या आईने हंबरडा फोडला त्यामुळे इतर नातेवाईकांनाही अश्रू अनावरण झाल्याने रुग्णालय परिसरात सर्वांकडून हळहळ व्यक्त होत होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com