Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून!

शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विविध विद्यापीठांतील प्रथम वर्षांचे नवे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने घेतला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील विद्यापीठांना 18 नोव्हेंबरपासून नवे वर्ष सुरू करण्याची मुभा मिळणार आहे. सध्या करोनामुळे द्वितीय, तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचे पुढील सत्राचे ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत.

प्रथम वर्षांचेही ऑनलाइन वर्ग राज्यातील विद्यापीठांत सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही केंद्रीय शिक्षण मंडळाच्या श्रेणीसुधार परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत.

त्याचप्रमाणे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा खोळंबल्यामुळे त्याचेही प्रवेश झालेले नाहीत. अंतिम वर्षांच्या पदवीच्या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांचीही प्रवेश प्रक्रिया झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर अद्यापही सुरू न झालेल्या सर्व अभ्यासक्रमांचे नवे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रवेश प्रक्रिया किंवा निकालाचे काम पूर्ण झाले नसल्यास वर्ष सुरू करण्यासाठी 18 नोव्हेंबपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांचे वर्ष 18 नोव्हेंबरपासून सुरू होणे अपेक्षित आहे.

सुट्ट्यांमध्ये कपात

यंदा सुट्टयांमध्ये कपात होणार आहे. जून-जुलैमध्ये सुरू होणारे शैक्षणिक वर्ष अद्यापही सुरू न झाल्यामुळे बुडालेला कालावधी सुट्टया कमी करून भरून काढण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. दोन्ही सत्रांच्या परीक्षेपूर्वी साधारण आठवडयाची आणि परीक्षेनंतर दुसरे सत्र किंवा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी साधारण आठवडयाची सुट्टी देण्यात येईल.

महत्त्वाचे मुद्दे

* पहिल्या सत्र परीक्षेपूर्वी 1 ते 7 मार्च 2021 सुट्टी देण्यात येईल.

* 8 ते 26 मार्च 2021 दरम्यान पहिल्या सत्र परीक्षा होतील.

* 27 मार्च ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत पहिल्या सत्राअखेरची सुट्टी देण्यात येईल.

* 5 एप्रिल 2021 पासून दुसरे सत्र सुरू होईल.

* दुसर्‍या सत्र परीक्षेपूर्वी 1 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत सुट्टी देण्यात येईल.

* 9 ते 21 ऑगस्ट 2021 दरम्यान दुसर्‍या सत्राच्या परीक्षा होतील.

* 22 ते 29 ऑगस्ट 2021 वार्षिक किंवा दुसर्‍या सत्राअखेरची सुट्टी देण्यात येईल.

* या तुकडीचे पुढील शैक्षणिक वर्ष 30 ऑगस्ट 2021 पासून सुरू होईल

- Advertisment -

ताज्या बातम्या